पालघर : शनिवारी सकाळपासून समुद्राने रौद्ररूप धारण केल्याने मोठ्या लाटा किनाऱ्यावरील घरावर धडकत होत्या. आपली घरे वाचवण्यासाठी घरासमोर मोठ्या पिशव्यांमध्ये माती भरून आपले संसार वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.पालघर जिल्ह्याला ११० किलोमीटरचा किनारा लाभला असून किनारपट्टीची धूप थांबून घरांना संरक्षण मिळावे यासाठी ८ ते १० गावांना धूपप्रतिबंधक बंधारे मंजूर करण्यात आले होते.मात्र हरित लवादात दाखल एका याचिकेमुळे या बंधाऱ्यांना पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला मिळत नसल्याने या बंधाºयाच्या उभारणीचे काम ठप्प पडले आहे. त्याचा मोठा फटका किनारपट्टीवरील घरांना बसू लागला आहे. जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.गुरु वारपासून समुद्रात तुफानी लाटा उसळत असल्याने किनारपट्टीवर राहणाºया अर्नाळा, वडराई, सातपाटी, नवापूर, उच्छेळी-दांडी आदी भागातील नागरिक भयभीत झाले होते. त्यातच शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास समुद्राला मोठी भरती येऊन ५.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.त्यामुळे आपल्या घरांच्या संरक्षणासाठी मिळेल त्या साहित्याचा आडोसा निर्माण करण्याचे काम अनेक गावांत सुरू होते.मागच्या वर्षी भरतीने सातपाटी गावात पाणी शिरून येथील सुमारे ३०० घरातील जीवनावश्यक वस्तूंसह फर्निचर आदी वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी विशेष बाब म्हणून सातपाटी येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे अत्यावश्यक असल्याचे म्हणणे न्यायालयात मांडले होते.न्यायालयाने सातपाटी येथे बंधारा बांधण्यास परवानगी दिल्या नंतर ११०० मीटरपैकी ५०० मीटर बंधाºयाच्या कामास सरकारी पातळीवरून परवानगी मिळाली होती. त्याचे काम दांडापाडा बाजूने सुरु वात होऊन क्रांती मंडळापर्यंत संपल्याने या भागातील घरे वाचली असली तरी तकदीर मंडळ,विशाल मंडळ,भाटपाडा आदी भागातील घरात मात्र पाणी शिरून नुकसान झाले. समुद्राला आलेल्या उधाणाचे गावात शिरलेल्या पाण्यासोबतच मुसळधार पाऊस ही कोसळत असल्याने एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते लोकांच्या घरात शिरले.
पालघरमध्ये समुद्राने केले रौद्र रूप धारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 10:27 PM