पालघर : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याच्या सर्वेक्षणाचे काम ग्रामसेवकाकडून काढून घेण्यात यावे असे मंत्री व प्रधान सचिवाना कळविण्यात येऊनही रत्नागिरीमधील खेड पंचायत समितीमधील ग्रामसेवकावर दाखल केलेल्या गुन्ह्णाचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने पालघर तहसिलदार कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने राज्यभरातील ग्रामसेवकाकडे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम आदरपूर्वक नाकारण्यात आले होते. त्याबाबतची माहितीवजा निवेदन संबंधीत मंत्री व प्रधान सचिवाकडे देण्यातही आले होते व त्याच्या प्रती जिल्हा व तालुका प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. ग्रामसेवकाकडे मूळ ग्रामपंचायतीच्या कामाचा मोठा ताण असताना विविध योजनांच्या अंमलबजावणी करणे, दुष्काळ निवारण उपाययोजनांची कामे इ. कामांचा प्रचंड व्याप व ताण वाढला आहे. तरीही नोंदवही अद्ययावतीकरणाच्या कामासाठी अतिरीक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे युनियनने मान्य केलेले असताना याबाबत शासन स्तरावरून युनियनशी चर्चा करण्याचे सौजन्यही शासनाने दाखवलेले नाही. उलटपक्षी रत्नागिरी जिल्ह्यात विनाचौकशी, बेकायदेशीरपणे नियुक्त प्राधिकरणाची पूर्व परवानगी न घेता ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे व कार्यवाही तहसिलदार खेड यांनी केलेली आहे. हि बाब निंदनीय असल्याचे निवेदनात सांगून तहसिलदार अमोल किसन कदम यांचा पालघर जिल्हा ग्रामसेवक युनियनच्यावतीने निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष आर. एल. पाटील, सचिव नितीन पवार, मयुर पाटील, सतीश भागवत, राहुल पाटील इ. च्या नेतृत्वाखाली पालघर तहसिलदार कार्यालयासमोर जमुन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (वार्ताहर)
ग्रामसेवक युनियनचा पालघर तहसिलवर निषेध मोर्चा
By admin | Published: December 02, 2015 12:13 AM