पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि आठ तालुक्यांच्या पंचायत समितींच्या चुरशीच्या निवडणुकीत मंगळवारी ६३ टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या ५४ गटांत आणि पंचायत समितीच्या ११२ गणांमध्ये अनेक ठिकाणी तिरंगी-चौरंगी लढती झाल्या आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून बुधवार, ८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत. निवडणुका स्थानिक असल्याने आणि गावांतील उमेदवार रिंगणात असल्याने सकाळी थंडी असतानाही काही मतदान केंद्रांवर रांगा पाहायला मिळाल्या. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मतदारांची गर्दी वाढली. काही मतदारसंघांत चुरशीच्या निवडणुका होत असल्याने स्वत: उमेदवार तसेच प्रत्येक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाताना दिसत होते. मतदारांना एकाच ईव्हीएम मशीनवर दोन उमेदवारांसाठी मतदान करायचे असल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील मतदारांचा गोंधळ झाल्याचेही दिसून आले. तसेच काही ठिकाणी मतदार यादीमध्येही गोंधळ असल्याचे पाहावयास मिळाले.निवडणुकीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती. मोठा पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी ठेवण्यात आल्यामुळे मतदान प्रक्रि या शांततेत व सुरळीत पार पडली. मतदानासाठी कामगाराना सवलत देण्यात आली होती.>महिलेवर हल्लाकेळव्याच्या आदर्श मंदिर शाळेतील बुथवर उमेश भोईर याने आपले नाव यादीत आहे का? याबाबत विचारले. त्या वेळी हितीशा पाटील यांनी त्याला रोखले. यावरून दोघांत वाद झाला. लोकांनी समजावल्यावर ते प्रकरण मिटले. हितीशा घरी जाण्यासाठी उभ्या असताना उमेशने तेथे येत कोयत्याने वार केले. यात त्या जखमी झाल्या. उमेशविरोधात केळवे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
पालघर जि.प. निवडणुकीत ६३ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 5:35 AM