नवीन पनवेल : पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारास मतदान करावे, यासाठी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातील मंगेश भोईर यांना दमदाटी करून मतदान केल्यास पाच लाख रुपये देऊ, असे आमिष दाखवले व त्यांना बळजबरीने डांबून ठेवले. या प्रकरणी चार आरोपींविरोधात ॲट्रॉसिटी व विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाल्याचे पनवेल तालुका पोलिसांनी मंगळवारी सांगितले.
पास्थळ, जिल्हा पालघर येथील मंगेश दयानंद भोईर हे २०१९ ला शिवसेना पक्षातर्फे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. पालघर जिल्हा परिषदेच्या महिला राखीव अध्यक्षपदाचा अडीच वर्षे कालावधी संपल्याने पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी या निवडणुकीत उद्धव ठाकरे पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करावे, यासाठी धाकटी डहाणू जिल्हा परिषद गटाचे सदस्य जयेंद्र किसन दुबळा, मोज जिल्हा परिषद गटाचे सदस्य अरुण ठाकरे, अमेय विकास पाटील व पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दबाव आणला. तसेच ८ नोव्हेंबर रोजी पंकज देशमुख व दोन अनोळखी जणांनी यांना गाडीत बसवून मोबाइल हिसकावून बंद करून विरार येथील उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यालयामध्ये नेले. तेथे चार -पाच तास कुठेही जाऊ न देता ठाकरेंच्या पक्षातील अध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आमिष व धाक दाखवला. त्या ठिकाणी अरुण ठाकरे, जयेंद्र दुबळा व अमेय पाटील आले. त्यांनीसुद्धा दमदाटी करून मतदान केल्यास पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखविल्याचे भोईर यांनी तक्रारी म्हटले आहे.
... आणि नजर चुकवून गाठले विराररक्कम स्वीकारण्यास नकार दिला असता त्यांनी पुन्हा त्याच गाडीमध्ये बसवून वरळी मुंबईत हिल व्हिलेज हॉटेल या ठिकाणी रात्रीस नेले. त्या ठिकाणी सहा अनोळखी व्यक्ती व त्यांच्यासोबत या चारही जणांनी त्यांना दमदाटी करून दोन दिवस मानसिक तणाव दिला. १० नोव्हेंबर रोजी त्यांची नजर चुकवून तेथून पळून आपण टॅक्सी पकडून लोकलने विरारला आलाे. त्यानंतर एकाच्या मोबाइलवरून त्यांनी रवींद्र फाटक यांना घडलेला प्रकार सांगून पास्थळ येथे सुखरूप पोहोचलो. सर्व जण पुन्हा गाठून अपहरण करतील, या भीतीने आपण पनवेल येथील एका हॉटेलमध्ये थांबलो. नंतर याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात जयेंद्र किसन दुबळा, अरुण ठाकरे, अमेय विकास पाटील, पंकज देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे भोईर यांनी म्हटले आहे.