पालघर : नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या उमेदवार डॉ. श्वेता पाटील-पिंपळे, आघाडीच्या डॉ. उज्वला काळे आणि सेना बंडखोर अपक्ष उमेदवार अंजली पाटील यांच्यात काटे की टक्कर रंगणार आहे. तर २६ जागेसाठी एकूण ८८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे. दरम्यान, शुक्रवारी पाच जणांना पैसे वाटप करताना पकडल्याने पालघरसांठी राजकीय कार्यकर्ते व पोलिसांनी फिल्डिंग टाईट केली आहे.पालघर नगरपरिषद निवडणुकीला बंडखोरीचे ग्रहण लागले असून जवळपास सर्वच प्रमुख पक्षात बंडखोरी झालेली आहे. एकूण ३० अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून शिवसेनेतुन सर्वाधिक १४ उमेदवारांनी बंडखोरी करीत निवडणूक लढवित जोरदार प्रचार सुरू केला आहे. सेनेचे कैलास म्हात्रे आणि भाजपाच्या गीता पिंपळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे समन्वयक एकनाथ शिंदे आणि आमदार रवींद्र फाटक यांनी अपक्षांना अर्ज माघारी घेण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्या नंतर जिंकण्याच्या इर्षेने अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. या अपक्षांना रोखण्यासाठी त्यांना नानाविध त्रास देत त्यांचे प्रचारासाठी लावण्यात आलेले फलक ही जबरदस्तीने उतरविण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनाचा वापर करून अपक्षांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अपक्ष उमेदवारांचे म्हणणे आहे.नगरपरिषदेच्या ताब्यात असणाऱ्या सुमारे ३५ एकर जमीन मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाने सिडकोच्या घशात घातल्या आहेत. अशावेळी पालघरचा कायापालट करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे प्रचार सभेत सांगणाºया मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभेत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी जमीनच शिल्लक ठेवली नसल्याने त्यांची आश्वासने ही फक्त ‘निवडणूक जुमला’ असल्याची टीका विरोधका मधून केली जात आहे.पालघर मध्ये शिवसेने चे वर्चस्व असल्याने मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित, भाजपाचे राज्यमंत्री रवींद्र शिंदे, आमदार रवींद्र फाटक यांनी दिवसरात्र एक करून मतदारांना युतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, बंडखोरीच्या ग्रहणाने गाजलेल्या या निवडणुकीत मतदार राजा युतीला तारतो की आघाडी आणि अपक्षांच्या पदरात आपल्या मताचे दान टाकतो हे येत्या सोमवारी दिसून येणार आहे.रविवारी होणाºया मतदानाच्या पार्श्वभूमीवर शनिवारच्या रात्रीत आमिषाचा महापूर लोटणार असून मताचे भाव वधारणार असल्याची शक्यता आहे. पालघर पोलिसानी ५ लोकाविरोधात मतदारांना पैशाचे प्रलोभन दाखिवण्याच्या आरोपा खाली गुन्हा नोंदविला असून त्यांच्या कडून हजारो रु पये जप्त केली आहे. तसेच, अनेक वार्डांमध्ये मातब्बरांकडून एका मताला बोली लावली जात आहे.तो ‘डॉक्टर’ कोण? सोशल मीडियावॉरनगराध्यक्ष निवडणुकीत सेना किंवा आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याच्या चतुर खेळी मागे पडद्या मागच्या एका डॉक्टरांची अहंम भूमिका असल्याची चर्चा सध्या पालघरमध्ये जोरात सुरू आहे.सोशल मीडिया वरून फिरणार्या काही मेसेज मधून काही बाबी पालघर वासीयांच्या लक्षात येत असून आपल्याशी काहीतरी वेगळीच खेळी खेळली जात असल्याचा संशय त्यातून व्यक्त होत आहे.दोघांपैकी एक उमेदवार निवडून आला तरी त्याची सुत्रे आपल्या हातात ठेवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? अशी ही शंका व्यक्त केली जात आहे.
पालघरची फिल्डिंग टाइट; २६ जागांसाठी आज मतदान, मतदारांना प्रलोभन, पाच जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 12:30 AM