हितेन नाईकपालघर : भंडारा येथील १० नवजात शिशूंच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यातील ३ उपजिल्हा रुग्णालयांची तपासणी तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या तीनही रुग्णालयांतील प्रसूती आणि नवजात शिशु विभागातील फायर ऑडिट झाले असले तरी इलेक्ट्रिक व्यवस्थेबाबतची तपासणी करण्यात येणार आहे.
भंडारा येथील अत्यंत भयंकर आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात या व्यवस्थेच्या तपासणीचे ‘मॉक ड्रिल’ घेण्याबाबत आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यात जव्हार, डहाणू आणि कासा अशी तीन उपजिल्हा रुग्णालये असून जव्हार येथे नवजात शिशु विभाग (चाईल्ड केअर सेंटर) कार्यरत आहे. अत्यंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रसूती आणि नवजात शिशू विभाग कार्यरत असून या तिन्ही उपजिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात यांनी दै. ‘लोकमत’ला दिली.
जिल्ह्यातील या रुग्णालयांमध्ये अग्निरोधक व्यवस्थेसाठी फायर एक्स्टिंगशन व्यवस्थाही ठेवण्यात आलेली आहे. भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त रामास्वामी यांनी राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून मार्गदर्शनपर सूचना दिल्या आहेत. भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आदी विभागाचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिक व्यवस्था याबाबत तपासणी करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिक वायरिंगपासून सर्व बाबींची तपासणी करून पुन्हा अशी दुर्दैवी घटना घडणार नाही, याची दक्षता घेण्यासाठीचे ‘मॉक ड्रिल’ घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.