मीरा रोड : नगरसेवकांसह अधिकारी, राजकारणी व कथित सामाजिक कार्यकर्त्यांची दमदाटी, जाच व कामातील हस्तक्षेपामुळे राज्य सरकार व महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या भार्इंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील मानदसेवेवरील सात स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञांनी आपली सेवा बंद केली आहे. यामुळे रुग्णालयातील प्रसूती व शस्त्रक्रिया ठप्प झाली आहे.
आधीपासूनच पालिकेचे रुग्णालय व्हावे व ते पालिकेने चालवावे, यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी उदासीनताच दाखवली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे रुग्णालयाचे बांधकाम झाले व पालिकेला रुग्णालयही सुरू करावे लागले. आता हे रुग्णालय सरकारला हस्तांतरित केले असले, तरी कारभार अजून पालिकेच्या सहकार्याने सुरू आहे. रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय यंत्रणा, उपकरणे, औषध, वैद्यकीयतज्ज्ञांची वानवा असल्याने काहींना जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे काम करणाऱ्या डॉक्टर, कर्मचाºयांनाही नगरसेवक, अधिकारी, राजकारणी व कथित समाजसेवकांच्या सततच्या हस्तक्षेपासह दमदाटी व धमक्यांना सामोरे जावे लागत आहे.या जाचाला कंटाळून अखेर रुग्णालयातील सात स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञांंनी आपली सेवा बंद केली आहे. तसे लेखी निवेदनच त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले आहे. निवेदनात या डॉक्टरांनी नगरसेवक, अधिकारी, राजकारणी व समाजसेवकांकडून दमदाटी, धमक्या व अरेरावी सुरू आहे. शिवाय, उपचार कशा पद्धतीने करावेत, हे डॉक्टरांना ठरवू न देता हीच मंडळी दबाव टाकून उपचार कसे करायचे सांगत असतात. रात्रीच्या वेळी तसेच आपत्कालीन स्थितीत भूलतज्ज्ञ नसतो व आवश्यक औषध मिळत नाही. यामुळेही रुग्णांचा रोष ओढून घ्यावा लागतो व वाद होत असतात.
वास्तविक, बुधवारी रात्री प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेची स्थिती पाहून डॉक्टरांनी आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया करावी लागेल, म्हणून हमीपत्र सही करून देण्यास सांगितले. त्यावर महिलेच्या नातलगांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी भाजपा नगरसेवकास बोलावले. त्यानेही दमदाटीची भाषा वापरत दबाव टाकला. या सर्व घटनेने अखेर आधीच त्रासलेल्या डॉक्टरांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. यातील काही डॉक्टर २०१५ पासून मानदसेवा देत होते. पुढे डॉक्टरांची राष्ट्रीय आरोग्य शहरी अभियान अंतर्गत अर्धवेळ वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून मानदसेवेवर नियुक्ती झाली होती. आॅन कॉल व बाह्यरुग्ण विभाग हे डॉक्टर सांभाळत होते. या रुग्णालयात ३० खाटा आहेत.याआधीही डॉक्टरांनी ठोकला रामराम : याआधीही अशाच प्रकारच्या जाचाला त्रासून पालिका सेवेत कायम झालेले डॉ. राहुल पाटील यांच्यासह अनेक डॉक्टरांनी पालिका रुग्णालयास रामराम ठोकला आहे.