वसई : विरार पूर्व येथील व गेल्या चार दशकांपासून विरारकरांची तहान भागवणाऱ्या पापडखींड धरणात छटपूजा करण्यास यंदा महापालिका मनाई करणार की नाही? याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. छटपूजेमुळे त्यातील पाणी गेल्या वर्षभरापासून दूषित झाल्यामुळे त्यातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. महानगरपालिकेची सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे सध्या या धरण क्षेत्रात नागरीक आपल्या गाड्या धुण्यासाठी सर्रास आणत असतात. तसेच छटपूजा समिती यंदाही छटपूजेचे धरणात आयोजन करणार असल्याची माहिती आल्यामुळे महानगरपालिकेकडे नवा पेच निर्माण झाला आहे.
विरार पूर्व येथील महानगरपालिकेच्या मालिकचे पापडखींड धरण हे शहरातील सर्वात जुने धरण म्हणून प्रसिद्ध आहे. ते जीवदानी डोंगराच्या पायथ्याशी फुलपाडा येथे बांधण्यात आलेले आहे. या धरणातून विरारकरांना दररोज एक दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र गेल्या काही वर्षात या धरणाचे पाणी छटपूजेमुळे प्रदूषित होऊ लागले होते. छटपूजा केली जात असल्यामुळे तसेच येणा-या पर्यटकांकडून कचरा टाकला जात असल्यामुळे हे प्रदूषित पाणी पिण्यास अयोग्य झाले होते. त्यानंतर या धरणातून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. याठिकाणी नंतर महानगरपालिकेची वॉटर पार्क बनविण्याची योजना होती, मात्र पर्यावरणवादी संघटना व नागरिकांनी याला विरोध केल्यावर हि योजना तूर्तास थांबविण्यात आली. मात्र आता या धरणाला कोणी वालीच उरला नसल्याचे समोर आले आहे. अनेकदा या परिसरात खाजगी वाहन चालक, रिक्षाचालक आपली वाहने धुण्यासाठी आणत असतात. तेथे कोणीही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे त्यांना कोणीही अडवत नाही.या धरणात महानगरपालिकेचा विरोध डावलून मोठ्या प्रमाणात छटपूजा केली जाते. हजारो लोक पूजे निमित्त धरणाच्या पाण्यात उतरून तेलाचे दिवे, नैवैद्याची फळे, फुले, पाने पाण्यात सोडत असतात. पन्नास ते साठ हजार नागरीक या धरणाच्या पाण्यात उतरत असल्यामुळे पाणी प्रदूषित होते. मध्यंतरी धरणाच्या पाण्यात कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर या धरणातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.महापालिकेचे होते आहे अक्षम्य दुर्लक्षमहानगरपालिका लक्ष देत नाही, तरी परिसरातील सुजाण नागरिक आणि विद्यार्थी पापडखींड धरण परिसरात स्वच्छता मोहिम हाती घेत असतात. 1972 साली धरण बांधले तेव्हा विरारची लोकसंख्या 15 हजार होती.धरणाची निर्मिती करण्यात आल्यानंतर दर दिवशी एक दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विरार शहराला करण्यात येऊ लागला. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे धरण आता प्रदुषित झाले आहे.धरणाच्या पाण्यात छटपूजा, आंघोळ, वाहनांची धुलाई, तेलाचे दिवे सोडणे, निर्माल्य विसर्जन याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात येतो आहे.