- सुरेश काटे तलासरी : भारतीय सेनेच्या भूज येथील लष्करी तळावरून १७ डेअरडेव्हीलची टीम पॅरामोटरच्या साहाय्याने सिकंदराबादला निघाली असून तलासरीत त्यांचे मंगळवारी आगमन झाले. भूज येथील सैनिकी केंद्रावरून १७५० किलोमीटर चे अंतर पार करून ते सिकंदराबाद येथे पॅरामोटरने पोहचणार आहेत. यामध्ये मेजर अमित जगदाळे व सुभेदार विजय सिंग यांच्यासह १० पायलट व २ प्रशिक्षक सहभागी असून आर्मीची कार आणि ट्रक देखील त्यात आहे.देशातील सामान्य जनतेचा लष्कराशी संपर्क यावा, नागरिकांमध्ये लष्कराबाबत जागृती निर्माण व्हावी आणि देशातील तरुण लष्कराकडे आकर्षित व्हावेत आणि साहसी खेळाबाबत तरुणांमध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी भारतीय सेनेतर्फे सेलिब्रेटिंग द स्पिरिट आॅफ अॅडव्हेंचर हा उपक्रम जनतेपर्यंत पोहचण्यासाठी हाती घेतल्याचे पथकप्रमुख मेजर अमित जगदाळे यांनी सांगितले. यावेळी ठक्कर बाप्पा विद्यालयातील विद्यार्थ्यांना पॅरामोटरींगच्या साहाय्याने आकाशात उड्डाण व यशस्वी लँडिंग करून विविध प्रात्यक्षिक सेनेच्या टीमने दाखविलीत.काय आहे, पॅरामोटारींगपॅरामोटारींग हा पॅराग्लायडींगचा प्रकार आहे. ग्लायडींगमध्ये तुम्ही ग्लायडर मध्ये बसून एखाद्या उंच टेकडी अथवा डोंगरावरून खाली झेप घेतात आणि हळू हळू खाली येतात. परंतु पॅरा मोटारींगमध्ये तुम्हाला डोंगरावर अथवा उंच स्थानी जाण्याची गरज नसते तर तुम्ही पायानी गती घेणाऱ्या अथवा चार चाके असलेल्या स्वयंचलित अशा इंजिनाचा वापर करून ग्लायडींगला गती देतात. त्यासाठी पायलट व ग्लायडरच्या वजनानुसार ५० ते ३५० सी.सी.चे अॅटोमोबाईल इंजिन वापरतात. हे इंजिन पेट्रोल अथवा डिझेलवर चालविले जाते. हे चालविणे व नियंत्रीत करणे अवघड असते. त्यामुळे त्याचे ज्यांनी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. अशाच व्यक्ती ते चालवू शकतात. त्यामुळेच ते चालविण्याचा साहसी खेळ लोकप्रीय असला तरी त्याचा प्रसार फारसा झालेला नाही. कोणत्याही सपाट प्रदेशावरून अथवा ज्यावर कापड अथवा तत्सम बाब अंथरुन जो सपाट केला आहे. अशा भागावरून पॅरामोटारींग करता येते.
लष्करी जवानांकडून तलासरीत पॅरामोटरींगची प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:55 PM