अनिरुद्ध पाटीलबोर्डी : उन्हाची तीव्रता वाढल्याने, गारगार सरबत आणि आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते. बोर्डी परिसरातील गावांमध्ये चक्क भंगारातील वस्तू घेऊन त्या बदल्यात आईस्क्रीम विकला जातोय. त्याच्या या व्यवसायाने मात्र, मुलांच्या जीवाशी खेळ चालला असून हा प्रकार थांबविण्याची मागणी सजग नागरिकांनी केली आहे.
बोर्डी आणि परिसर हा ग्रामीण भाग असून आदिवासी पाड्यांनी व्यापला आहे. येथील पालक रोजंदारीवर कामाला जात असल्याने मिळणारी मजुरी तशी अल्पच, त्यामुळे पाल्यांना काही वेळा खाऊ करिता पैसे दिले जात नाही. याचाच फायदा उठवत काही भंगारविक्रेते सक्रिय झाले असून भंगाराच्या बदल्यात ते मुलांना आईस्क्रीम देतात.
सध्या उन्हाळ्याची सुट्टी असून या फावल्या वेळेत जिभेचे चोचले पुरविण्याकरिता ही बच्चेकंपनी परिसरात फिरून भंगार गोळा करतात. थोडी पायपीट केली की ते सहज उपलब्धही होते. शिवाय त्या बदल्यात तृप्त होईपर्यंत या थंड पदार्थाचा आस्वाद लुटता येत असल्याने या मुलांकरिता ही सुवर्णसंधीच आहे. त्यामुळे हा आईस्क्रीम विक्रेता परिसरात कधी येतो, याकरिता त्याच्या वाटेकडे ही मंडळी डोळे लावून बसलेले असतात. या देवाणघेवणीच्या व्यवहाराने येथील अशिक्षित पालक आणि भंगारविक्रेता फायद्यात असल्याचे दिसत असले तरी त्याची मोठी किंमत मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊन मोजावी लागणार आहे. कारण ज्या हाताने भंगार घेतले जाते, त्याच हाताने तो आईस्क्रीमला हात लावतो. त्यामुळे जलजन्य आणि विषाणूजन्य जंतूंचे संक्रमण होते. हे आईस्क्रीम शहरातील झोपडपट्टीत या भंगारविक्रेत्याने घरच्या घरी बनविलेले असून त्याकरिता वापरलेले पाणी, रंग आणि त्याला गोडवा आणण्याकरिता कोणत्या पदार्थाचा वापर केला असेल याचा अंदाज बांधलेला बरा. तथापि असे प्रकार तत्काळ थांबविण्याची मागणी होत असल्याचे राकेश सावे या स्थानिकाने सांगितले.
परंतु हा गैरप्रकार थांबविण्याकरिता पुढाकार घेणार कोण? हा प्रश्न आहे. कारण अशा भंगारविक्रेत्यांचे एक सर्कल असून त्यांचा संबंध अनेकांशी असतो, त्याचाच वापर करून काही वेळेला सामान्यांना धमकविण्याचे प्रकार अनकेदा घडले आहेत.