पारोळ : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला दोन्ही बाजूंनी वाहने उभी केल्यामुळे तेथील रहदारीला अडथळा होत असल्याच्या तसेच वाहतूककोंडी होत असल्याच्या तक्रारी महापालिकेला वारंवार नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहात असल्याने दैनंदिन स्वच्छता करतानाही या वाहनांचा अडसर होत आहे. महत्त्वाचे म्हणजे अत्यंत तातडीच्या प्रसंगी रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने यांनाही रस्त्यावर उभ्या केलेल्या या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर अडचण होऊन मदतकार्य करण्यात अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी व निवेदने देऊनही काहीच कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
वसई-विरार शहरी भागात पार्किंगची समस्या मोठी असून पार्किंगला कोणतीच शिस्त नसल्याने त्याचा दैनंदिन नागरी जीवनावर परिणाम होत आहे. पार्किंगचा तिढा मोठा असताना महापालिकेकडून प्रशस्त वाहनतळ (मल्टिस्टोरेड पार्किंग) उभारण्याचा निर्णय होत नसल्याचे दिसून येते. वाहतुकीला आधीच शिस्त नाही त्यात रोज होणारी वाहतूककोंडी, गैरकायदेशीर केलेली पार्किंग यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत चालला आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला, तसेच गल्लीबोलात, जागा दिसेल तिथे मनमानीपणे वाहने पार्किंग करून ठेवणे या प्रकारांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. काही ठिकाणी वाहने इतकी बेशिस्तपणे पार्क करून ठेवली जातात की त्यामुळे मुख्य वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांनादेखील रस्त्याच्या कडेला चालताना पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांचा अडथळा निर्माण होतो. साहजिकच नागरिकांना चालण्यासाठी मुख्य रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावरून चालताना अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.बेवारस वाहने रस्त्यांवरच पडूनमहापालिका हद्दीमध्ये काही ठिकाणी बेवारस वाहने रस्त्यांवर पडून आहेत. कितीतरी वाहने अनेक महिने, वर्षे रस्त्यावर उभ्या असलेल्या ठिकाणाहून हलविलेली दिसत नाहीत. त्याशिवाय बऱ्याचदा रस्त्यांवर ट्रक, कंटेनर, स्कूल बसेसची पार्किंग होत असल्याने वाहतूककोंडी होऊन रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.