पालघर - शिवसेना-भाजपाची युती झाल्यामुळे इच्छुक शिवसेना आणि भाजपा उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकवायला सुरुवात केली आहे. नाशिक शहरातील नाशिक पश्चिम मतदार संघ भाजपाकडेच राहील्याने या मतदार संघातील शिवसेनेचे इच्छूक आणि नगरसेवक संतप्त झाले असून त्यांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी बुधवारी एका हॉटेलमध्ये बैठक सुरू असून नाराज शिवसैनिकांनी राजीनामा देण्याचं तयारी दर्शवली होती. तर, आता पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि शिवसेना नेत्यानंही राजीनामा दिला आहे.
पालघर जिल्हा परिषदेचे शिवसेना गटनेते प्रकाश निकम यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिलं आहे. युती झाली तरी मला विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येईल, असा शब्द देण्यात आला होता. मात्र, पक्षनेतृत्वाने तो शब्द पाळला नाही. माझ्यावर वेळोवेळी पक्षाकडून अन्याय झाल्याचं सांगत प्रकाश निकम यांनी उद्धव ठाकरेंकडे आपल्या सर्वच पदांचा राजीनामा पाठवला आहे. शिवसेना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक यांनाही याबाबत माहितीची प्रत दिली आहे.
शिवसेना भाजपाच्या युतीमुळे अनेक इच्छुक उमेदवार नाराज झाले असून काहींनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, अनेक नेत्यांनी आपल्या नगरसेवकांच्या राजीनाम्यासह आपलाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे जागावाटप हे शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं दिसून येतय. अद्यापही काही जागांवरचा वाद कायम असल्यानेच उर्वरित उमेदवारांची यादी वेटिंगवर आहे.