पालघर : वाढवण बंदराबाबत मी लोकांच्या सोबत आहे, अशी काहीसी अस्पष्ट भूमिका सेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक वर्षांपासून जाहीर केली होती. मात्र जी भूमिका ठाकरे यांनी ‘नाणार प्रकल्पा’बाबत घेतली तशीच स्पष्ट भूमिका वाढवण बंदराबाबत जाहीर करून वाढवण बंदर विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला बळ द्यावे, अशी आशा सेनेचा बालेकिल्ला बनविणारे किनार पट्टीवरील मतदार व्यक्त करीत आहेत. उद्या (गुरुवारी) उद्धव ठाकरे मनोर येथे असणाऱ्या सभेत काय स्पष्ट भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
वाढवण बंदराच्या उभारणीला स्थगिती मिळविण्यास महत्त्वाची भूमिका बजावणारे प्राधिकरण रद्द करावे, अथवा त्या प्राधिकरणात आपली सोयीची माणसे घुसवून वाढवण बंदर उभारणीचे सर्व मार्ग मोकळे करावेत, अशा हालचाली केंद्र व राज्य सरकारकडून सुरू झाल्या होत्या. त्यामुळे डहाणू, पालघर विधानसभा क्षेत्रातील मच्छिमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर आदी स्थानिक भूमिपूत्र संतप्त झाले होते. आम्ही ज्या शिवसेना-भाजपला मतदान करून त्यांना सत्तास्थानी बसवले तेच आता निवडून आल्यावर वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी सारखे विनाशकारी प्रकल्प आमच्यावर लादून आम्हाला उद्ध्वस्त करू पहात असतील तर आम्ही ज्या अमूल्य मताच्या जोरावर तुम्हाला सत्ता मिळवून दिली. त्याच मताच्या जोरावर सत्तेपासून रोखू ही शकतो, असा इशाराच जणू बंदर विरोधी स्थानिक भूमिपुत्रांनी दिला आहे.
अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याने उग्र स्वरूप धारण केले असून कुठल्याही उमेदवारांनी प्रचारासाठी इथे येऊ नये, असे फलकच ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर टांगले आहेत. हजारो मतदारांनी शासनाकडून वाटण्यात आलेल्या मतदान स्लीपाची होळी करून या मतदानाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.लोकसभेच्या निवडणुकीत मच्छीमारांना दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेकडेही मच्छिमार समाजाचे लक्ष लागून राहिले असून डिझेल वापरावरील अडून राहिलेले ४ ते ५ कोटींचे अनुदान, ओएनजीसी सर्वेक्षण नुकसान भरपाई, समुद्रातील प्रलंबित असलेला हद्दीचा वाद, पोखरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, बुलेट ट्रेनला सेनेने जाहीर केलेला विरोध याबाबतही उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतात का? याकडेही स्थानिक भूमिपुत्रांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यात वाढवण बंदराच्या विरोधातील आंदोलन भडकू लागले असून पालघर, डहाणू विधानसभा मतदार संघातील अनेक गावांनी उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी गावात प्रचाराला येऊ नये, असे फलक ठिकठिकाणी लावले आहेत.धाकटी डहाणू, गुंगवाडा, वरोर, वाढवण आदी भागातील तरुणांनी ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’ असे लिहून रस्ते रंगवणे, सोशल मीडियातून जनजागृती केली जात असून लोकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्थानिकांच्या या प्रश्नावर सेना पक्ष प्रमुख काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.