नालासोपारा (मंगेश कराळे) :- मोबाईल हा मानवाचा अभिवाज्य भाग बनला आहे. एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशाच सोडून दिली जाते. एवढ्या प्रचंड लोकसंख्येत पोलिस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात. पण तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अनेकदा मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. ही शक्यता पेल्हार पोलिसांनी खोडून काढली आहे. मंगळवारी सकाळी चोरी, गहाळ झालेले २० मोबाईल पेल्हार पोलिसांनी नागरिकांना परत केले आहे.
पेल्हार पोलीस ठाण्याच्या परिसरात गेल्या काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरीला तसेच हरवलेले मोबाईल शोधणे हे देखील पोलिसांच्या समोर एक मोठे आवाहन असते. पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी लाखो रुपये किंमतीचे एकूण २० मोबाईल शोधून काढले आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त जयंत भजबळे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मालकांना परत देण्यात आले. यावेळेस नागरिकांना सायबर गुन्हेगारी, मोबाईल चोरीपासून कसे वाचावे आणि मोबाईल आणि डेटा सुरक्षित कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. मोबाईल परत मिळाल्याने, अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. मोबाईल परत मिळाल्यानंतर लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी अथक मेहनत करून मोबाईलचा शोध लावला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत भजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (प्रशासक) शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, रवि वानखेडे, किरण आव्हाड, मिथुन मोहिते, निखिल मंडलिक, संजय मासाळ, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी केली आहे.