मनोर : महसूल विभागाने परवाने बंद केले असले तरी चहाडे येथे अवैध रेती भरून जाणारा दहाचाकी डम्पर अडवून महसूल विभागाने २ लाखांचा दंड वसूल केला. पाच दिवसांत सफाळे व मनोर मंडळ अधिकारी कार्यालयांतर्गत २७ लाख रु. सरकारी तिजोरीत जमा करण्यात आले. मनोर-सफाळे मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रात महसूल विभागाने अवैध वाहतूक करणाऱ्या रेती, माती, दगड, खडी, मोटार वाहनांची धरपकड सुरू केली असून वरईफाटा, पारगाव, धुकटन, चहाडे, टेन, मनोर नाक्यानाक्यांवर आतापर्यंत ४० ते ५० वाहने पकडून त्यांच्याकडून पाच दिवसांत २७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र, चहाडे येथे चार ब्रास रेती घेऊन जाणाऱ्या दहाचाकी डम्परला २ लाखांचा दंड केल्याने परिसरातील वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. शिवाजीराव दावभट, उपविभागीय अधिकारी व चंद्रसेन पवार तहसीलदार यांच्या आदेशाने सध्या मंडळ अधिकारी नरुडे, तलाठी भोईर, सुर्वे, पाटील व इतर तलाठी यांनी रात्री-बेरात्री अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयात तलाठी हजर नसल्याने नागरिकांची कामे रखडत आहेत. (वार्ताहर)
रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून दंडवसुली
By admin | Published: October 24, 2015 11:20 PM