(मंगेश कराळे)
नालासोपारा : गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी महागड्या कारचे म्युझिक सिस्टीम, टेप चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी १५ गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
विरारच्या देवेंद्र खेमराज जैन (४८) यांच्या इनोव्हा कारमधून ३ ते ५ डिसेंबर दरम्यान चोरटयाने त्यांच्या गाडीच्या डाव्या बाजुकडील दरवाज्याची काच तोडुन, नुकसान करुन कारमधील टोयोटो कंपनीचा कारटेप चोरून नेला होता. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील परिसरात गेल्या काही महिन्यांपासुन महागडया कारचे काच फोडुन म्युझिक सिस्टीम/कार टेप चोरीच्या गुन्हयाच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होवून सदर गुन्हे करणारी टोळी अधिक सक्रीय झाली होती. सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच दाखल गुन्हयांचा तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष 3 कडे वर्ग करण्यात आला होता.
गुन्हयात तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गुप्त बातमीवरुन आरोपीत जुबेर रईस अहमद (३२) आणि शहनवाज मोहम्मंद अलियार खान (१९) या दोघांना ९ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. तर तिसरा आरोपी परवेज इकबाल सैय्यद (३६) याला १२ डिसेंबरला अटक केली आहे. सदर आरोपीतांकडून गुन्हा करण्याकरीता वापरण्यात आलेली दोन कार व चोरी केले २० म्युझिक सिस्टीम, कारटेप असा एकूण १० लाख ३२ हजार १६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी जुबेर रईस अहमद हा कारटेप चोरीचा सराईत आरोपी असुन त्याचेवर कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र मधील विविध ठिकाणी ३५ पेक्षा जास्त गुन्हे नोंद आहेत. सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) अमोल मांडवे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मुकेश तटकरे, सागर बारवकर, सचिन घेरे, शंकर शिंदे, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.