जव्हार : पंचायत समिती जव्हार व एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजना जव्हार १ यांच्या वतीने बुधवारी महादेव आळी समाज मंदिर येथे जागतिक जलदिनानिमीत्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती उपसभापती सीताराम पागी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उपस्थित महिलांनी जल प्रतिज्ञा घेऊन पाणी प्रश्न सोडविण्याचा निर्धार केला.जव्हार तालुका हा डोंगराळ प्रदेश असून या भागामध्ये खूपच पाऊस पडतो. परंतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने सर्व पाणी वाहून जाते व उन्हाळा आला की, बहुतेक गावांत पाणीटंचाई सुरू होते. यासाठी सर्व उपस्थित महिला लोकप्रतिनिधींनी यावेळी जास्तीत जास्त पाणी नियोजन करण्यावर भर देण्याचा निर्धार केला. तसेच पेसा कायद्याची अंमलबजावणी करून जास्तीत जास्त गावात नळयोजना सुरू करून गावात पाणी पोहचवू असा ही निर्धार केला. तसेच विस्तार अधिकारी पुंडलिक हरड यांनी महिला बचत गट व महिला सक्षमीकरण, पंचायत राज मधील महिलांचे स्थान व त्रिस्तरीय रचना महत्व व ग्रामपंचायत गावस्तरीय समिती व त्याचे कार्य या विषयी मार्गदर्शन केले. जव्हार बालविकास प्रकल्प अधिकारी नीता खोटरे यांनी महिलांच्या बालविकास योजना कुपोषित बाळाची काळजी व पाण्याची गरज व नियोजन याविषयी महिलांना माहिती दिली. तसेच यावेळी प्रमुख मान्यवर जि. प. अध्यक्ष सुरेखा थेतले, पंचायत समिती सभापती ज्योती भोये व एकात्मिक बालविकास प्रकल्प मुख्यसेविका, विस्तार अधिकारी व तालुक्यातील ग्रामपंचायत मधील महिला लोकप्रतिनिधी महिला बचत गट उपस्थित होते.(वार्ताहर)
जव्हारला जलदिनानिमित्त लोकप्रतिनिधी मेळावा
By admin | Published: March 30, 2017 5:16 AM