नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेने २०१८-१९ मध्ये विक्र मी मालमत्ता कराची वसुली केली होती. त्यानुसार यंदा देखील त्याहून जास्त करवसुलीसाठी वसई-विरार महापालिका सज्ज झाली असून एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यात १५३ कोटींची मालमत्ता करवसुली झाली असून हे प्रमाण ४१ टक्के आहे. त्यामुळे ५९ टक्के करवसुलीचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असून यंदा ३०० कोटींचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
वसई-विरार शहरात एकूण ८ लाख औद्योगिक व वाणिज्य असे मालमत्ताधारक आहेत. मालमत्ता कराची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१९ होती. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर ९६ कोटींचा टप्पा पालिकेने पूर्ण केला होता. तर गेल्या वर्षी ८१ कोटी ५४ लक्ष इतका कर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर पालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाला होता. मात्र फक्त एकाच महिन्यात हा आलेख वाढला असून ही वसुली डिसेंबर महिन्यात चक्क १५३ कोटींवर म्हणजेच ४१ टक्क्यांवर गेली आहे. मागील वर्षी हीच वसुली १४४ कोटींवर होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९ कोटींची ज्यादा वसुली झाल्याचे पालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी सांगितले.३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कर भरण्याची मुदत होती. मात्र आता भरण्यात येणाऱ्या मालमत्ता करावर २ टक्के शास्ती १ जानेवारी २०२० पासून लागण्यास सुरुवात झाली आहे. तसेच दुसरीकडे कर वसुलीची प्रक्रि या महापालिकेतर्फे सुरू करण्यात आली असून प्रभाग समिती स्तरावर सभा घेण्याचे काम सुरू आहे. यानंतर प्रभाग समिती स्तरावर कर भरण्यासाठी बॅनर्स लावण्यात येणार असून नागरिकांना सूचित करण्यात येईल. तसेच यासह कर्मचारी आणि अधिकारी यांची टीम तयार केली असून विशेष मोहीम हाती आली आहे. पुढील महिन्यापासून मालमत्ता कर न भरणाºया मालमत्ताधारकांच्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच यासह नळ जोडण्यादेखील खंडित कारण्याचे काम पालिकेतर्फेकरण्यात येणार आहे. एवढेच नव्हे कर न भरलेल्यांच्या जप्त मालमत्ता लिलावाची २१ दिवसांची नोटीस पुढील महिन्यापासून बजावण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
मागील वर्षी म्हणजेच २०१८-१९ मध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने या वर्षी कंबर कसली होती. त्याचे फळ पालिकेला मिळाले होते. मार्च ३१ पर्यंत एकूण २२१ कोटीची मालमत्ता कराची वसुली पालिकेतर्फे करण्यात आली होती. २०१७-१८ या आर्थिक वर्षात पालिकेने १६४ कोटी रु पये इतका मालमत्ता कर वसूल केला होता. मात्र मालमत्ता कर पालिकेचे प्रमुख उत्पन्नाचा स्रोत असल्याने महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.घरपट्टी न भरणाऱ्यांच्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता या पुढील महिन्यापासून जप्त होणार आहेत. तसेच यासाठी नळ जोडण्या खंडित देखील करण्यात येणार आहेत. त्यामुळे मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर आपला मालमत्ता कर भरण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे केले आहे. - विश्वनाथ तळेकर, सहाय्यक आयुक्त, करसंकलन विभाग, वसई-विरार महानगरपालिका.