वाडा: या तालुक्यातील बहुतांशी विट उत्पादक विजेच्या तारांवर हूक टाकून करीत असलेल्या वीजचोरीमुळे महावितरणचे होत असलेले नुकसान रोखण्यासाठी महावितरणने ७ हजाराची अनामत रक्कम भरल्यानंतर एका दिवसात विद्युत मीटर देण्यास प्रारंभ केला आहे. या योजनेचा लाभ वीट उत्पादकांनी घ्यावा, वीजचोरी उघडकीस आल्यास जबर दंड ठोठावला जाईल असा इशारा महावितरणने दिला आहे.वाडा तालुक्यातील अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून वीट उत्पादन करतात. हा धंदा सहा ते सात महिने चालतो. गावाच्या बाहेर किंवा माळरानावर हा व्यवसाय शेतकरी करतात. धंदा करीत असलेल्या जागेवर येथील मजूर अंधारात न राहता जवळून गेलेल्या वीज तारांवर हूक टाकून खुलेआम वीज चोरी करीत असतात. तसेच या धंद्याला पाण्याची गरजही मोठ्या प्रमाणात लागते. वीट उत्पादक हे पाणी नदी, नाले, विहीर किंवा कुपनलिकेतून पाणी घेतात. हे पाणी घेण्यासाठी विद्युत पंपाचा वापर करतात. यासाठीच्या वीजेची गरज देखील चोरट्या विजेतूनच भागविली जाते. वीज चोरीने महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्याच बरोबर आकड्यां मुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व टाळण्यासाठी महावितरणने एक अनोखी योजना आखली आहे. संबंधित वीट उत्पादक व्यवसायिकाने ७ हजार रुपये अनामत रक्कम महावितरण कंपनीकडे जमा केल्यास त्या व्यावसायिकाला एका दिवसात विद्युत मीटर देण्यात येणार आहे. या वीट उत्पादकांना या साठी मुदतही देण्यात आली आहे. याचा परिणाम दिसून येईल व वीजचोरी घटेल असा विश्वास महावितरणला आहे.ज्या वीज कर्मचाऱ्यांच्या भागामध्ये अशी वीज चोरी निदर्शनास आल्यास त्यास त्या कर्मचाऱ्याला जबाबदार धरून खातेअतंर्गत कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले असून त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.
विटभट्यांची राजरोस वीजचोरी रोखणार
By admin | Published: December 14, 2015 12:42 AM