वसई : वसई पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या फणसपाडा येथील अंगणवाडीची वास्तू कोसळण्याच्या स्थितीत असून विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतीची दुरु स्ती न झाल्याने अशी दुर्दशा झालेली आहे. वसई-विरार महानगरपालिकेकडून दुरु स्तीसाठी फंड मिळून देखील अंगणवाडीत काहीच दुरुस्ती झाली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मोडकळीस आलेले छत, भेगा पडलेल्या भिंती, तुटलेल्या खिडक्या आणि दरवाजे तुटलेले शौचालय अशी या इमारतीची परिस्थिती आहे. काहीच महिन्यांपूर्वी या अंगणवाडीतील भांडी देखील चोरीला गेली होती. येथे जवळपास ७० विद्यार्थी शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवतात. जर उद्या कोणतीही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल नागीरीकांनी केला आहे. पावसाळ्यात या मुलांची अधिकच गैरसोय होते. नगरसेवक व महानगरपालिके तर्फे वारंवार या अंगणवाडीला मदत केली जाते. महापालिकेने तीन वर्षांपूर्वीच पाच लाख रु पये दुरु स्ती साठी दिले होते. मात्र, त्यातून कोणती दुरुस्ती झाली हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. दरम्यान, या अंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी स्थानिकांकडून व महापालिकेकडून अनेकदा प्रस्ताव तयार झाले आहेत हे विशेष.
या अंगणवाडीत गरीब व गरजू कुटुंबातील मुलं पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवत असल्यामुळे त्यांना चांगले शिक्षण देणे ही पंचायत समितीची जबाबदारी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
भांडी चोरीला गेली तेव्हा आम्ही मदत केली होती. आम्ही सतत मदत करत असतो परंतु, पंचायत समितीकडून काहीच प्रयत्न होत नाहीत. फंड कुठे जातो, कुठे वापरतात, तेच समजत नाही. आमचा कडून जितकं शक्य होईल तितकं काम आम्ही करत आहोत.
- प्रफुल्ल पाटील ( नगरसेवक)