भिवंडी : शहरातील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी जुन्या मुंबई-आग्रा मार्गावर धामणकरनाका उड्डाणपूल, कल्याणनाका ते बागेफिरदोस मशिदीपर्यंत स्व. राजीव गांधी उड्डाणपूल तसेच भिवंडी-वाडा रोडवर वंजारपट्टीनाका उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. मात्र, या पुलांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात या पुलांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने चालवणे मोठी कसरत ठरत असताना या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे भिवंडी महापालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याची नाराजी वाहनचालक व्यक्त करत आहेत.
भिवंडी-वाडा रोडवरील वंजारपट्टीनाका येथे दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलावरील रस्त्याची मुसळधार पावसात अक्षरश: चाळण झाली आहे.त्यामुळे पुलावरील वाहतूक मंदावत असल्याने वाहतूककोंडी गंभीर बनली आहे. रात्री खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अवजड वाहने त्यात आदळून बंद पडत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाच्या ढाच्यालाच धोका निर्माण झाला आहे. शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी भिवंडी-वाडा व नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या वंजारपट्टीनाका या मुख्य चौकात एमएमआरडीएच्या माध्यमातून चौरंगी मार्ग असलेला उड्डाणपूल दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. या उड्डाणपुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम जेएमसी या कंपनीकडे आहे. दीड वर्षापासून ठेकेदाराने उड्डाणपुलाच्या दुरु स्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुलावरील रस्त्याचा पृष्ठभाग खराब होऊन वरच्या थराचा स्लॅब खुला झाला आहे. रस्त्यावरील काँक्रि ट खराब झाल्याने मोठे खड्डे पडले आहेत.पुलावरील भिवंडी-वाडा-नाशिककडे जाणारी लहानमोठी वाहने तसेच ट्रक व कंटेनर आदी अवजड वाहने खड्ड्यांमध्ये आदळत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहने बंद पडण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. येथे दुचाकी अपघातही वढल्याने वाहतूककोंडी होत आहे. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ठेकेदारामार्फत हा पूल दुरु स्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे पत्र पालिकेतील भाजपचे गटनेते निलेश चौधरी यांनी पुलाच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. वेळीच दुरुस्ती न झाल्यास स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाप्रमाणेच वंजारपट्टी पुलाचीही दुरवस्था होण्याचा इशारा चौधरी यांनी दिला.धामणकरनाका येथील उड्डाणपुलाचीही वाताहत झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या पुलांच्या दुरु स्तीकडे पालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने या पुलावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांमुळे याठिकाणी नेहमीच अपघात घडत आहेत. उड्डाणपुलांवर पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी प्रशासनाकडून भरण्यात आले होते, मात्र तीन दिवसांपासून पडणाºया पावसामुळे शहरातील रस्त्यांबरोबरच या उड्डाणपुलांवरही खड्डे पडले असून पालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर हे खड्डे भरण्यात येतील, असे भिवंडी महापालिकेचे आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी सांगितले.हलकी वाहने चालवणेही धोकादायकस्व.राजीव गांधी उड्डाणपुलाच्या निकृष्ट बांधकामामुळे या पुलाचा एसटी स्थानकासमोरील स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना मागील वर्षी घडली होती. त्यानंतर, थातूरमातूर दुरु स्तीनंतर पुन्हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला होता. बांधकाम खूपच निकृष्ट असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीने पुलाला हादरे बसत आहेत. या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तर, पूल कधीही दुर्घटनाग्रस्त होण्याचा धोका निर्माण झाल्याने पालिका प्रशासनाने अवजड वाहनांच्या वाहतुकीला या पुलावर बंदी घातली आहे. मात्र, हलकी वाहने चालवणेही धोक्याचे आहे.