पारोळ : नवघर माणिकपूर विभागातील चुळणे-गास रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिर परिसरात मनपाने साकारलेल्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा महापौर प्रविणा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार क्षितिज ठाकूर, आमदार विलास तरे, माजी खासदार बळीराम जाधव, प्रथम महापौर राजीव पाटील, सभापती नितीन राऊत, माजी महापौर नारायण मानकर, माजी जि.प.अध्यक्ष बबनशेठ नाईक, प्रकाश रॉड्रीग्ज, प्रविण शेट्टी, पंकज चोरघे, कल्पेश मानकर,वृन्देश पाटील व परिसरातील असंख्य नागरीक उपस्थित होते. सहा एकर जागेत हे उद्यान साकारले असून त्यात स्वच्छतागृह, जॉगिंग पार्क, मुलांसाठी खेळणी, विविधरंगी गुलाबाच्या बागा, शोभिवंत झाडे असून संपूर्ण परिसर प्रदूषण विरहीत आहे. हिरवीगार उद्याने नागरीकांच्या आरोग्यास हितकारक असून त्यामुळे उद्यानात अस्वच्छता होऊ नये, ही नागरीकांची जबाबदारी असल्याचे महापौर प्रविणा ठाकूर यांनी सांगितले. तुळजाभवानी मंदिराशेजारील परिसर हा रमणीय व सुंदर असून नैसर्गिकरित्या विकसीत झालेला आहे. त्यामुळे याठिकाणी अनेक जातीचे पक्षी, फुलपाखरे असतात. अनेक दुर्मीळ पक्षांची ओळख यानिमित्ताने भावी पिढीला होईल असेही त्यांनी यावेळी सांगीतले. कार्यक्र माचे सूत्रसंचलन सभागृह नेते फ्रँक डिसोजा आपटे यांनी केले, तर आभार सभापती प्रकाश रॉड्रीग्ज यांनी केले. (वार्ताहर)
तुळजाभवानी उद्यानाचे थाटात लोकार्पण
By admin | Published: February 21, 2017 5:06 AM