डहाणू/कासा : पालघर जिल्हयातील अनेक गाव पाडे आजही विदारक परिस्थितीत जिवन जगत आहे. डहाणू तालुक्यातील साये-आकेगव्हान पुलाअभावी येथील गाव परिसरातील नागरिक सध्या जिवावर उदार होेवून नदीचा प्रवास एका साध्या लाकडी होडीतून करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.डहाणू तालुक्यातील साये व पालघर तालुक्यातील आके गव्हाण यांना जोडणारा सूर्या नदीवरील पूलच नाही. उर्से, साये, आंबिस्ते, दाभोण, म्हसाड आदी गावातील नागरिकांना पलिकडील बोईसर बाजापेठेकडे व नानीवली, रावते, आकेगव्हाण जाण्यासाठी नदी हाच पर्याय आहे. उन्हाळयातही या नदीत मुबलक पाणी असते. तर पावसाळयात या नदीला मोठया प्रमाणात पूर असतो. साये-उर्से परिसरातील मोठया प्रमाणात नागरिक रोजगारासाठी बोईसर येथिल औद्योगिक कारखान्यात कामावर जातात. व शाळकरी मुले बोईसर, नागझरी येथे जातात. तसेच नदी पलिकडे बोईसर नानीवली बस सुविधा आहे. परंतु पावसाळयात पूल नदीवर नसल्याने नागरिकांना २० किमी. अंतर कापून चारोटी मार्गे जावे लागते. नाईलाजास्तव नागरिकांना हा प्रवास करावा लागतो. मात्र उन्हाळयात सुर्या नदीचे पात्र धमणी धरणाच्या पाण्याने भरत असले तरी बऱ्याच ठिकाणी नागरिक व शाळकरी मुले नदी पार करण्यासाठी टाक्यांची होडी करून जिवावर बेतणारा प्रवास करताना दिसतात. या लाकडी होडीस दोन्ही तिरावर लाकडी खांब गाडून दोऱ्या बांधलेल्या असतात. ज्या तिरावर जायचे आहे त्या दोरीस होडीत बसल्यावर स्वत: खेचत जावे लागते. असा हा धोकादायक प्रवास कारवा लागतो. (वार्ताहर)
जीवावर बेतणारा करावा लागतो प्रवास
By admin | Published: June 03, 2016 1:46 AM