वसई : प्लास्टर आॅफ पॅरिस व कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्त्या अशास्त्रीय असून निसर्गालाही घातक आहेत. त्यासाठी शाडूच्याच मूर्ती पूजाव्यात यासाठी आमची वसई मोहिम शाडूच्या मूर्तीही उपलब्ध करून देणार आहे.प्लास्टर आॅफ पॅरीस पासून बनवलेल्या मुर्ती अशास्त्रीय व निसर्गाला घातक आहेत. साईबाब, स्वामी समर्थ, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीकृष्ण, खंडोबा, बाहुबली आदी रुपात तसेच विचित्र रुपातील व भल्यामोठ्या मुर्ती बसवणे अशास्त्रीय आहे. जेवढी मूर्ती तेवढा देव मोठा आणि तेवढाच मोठा त्याचा आशिर्वाद असा समज चुकीचा आहे. आपल्या अशास्त्रीय वागण्यामुळे काही संधीसाधू लोक आपल्या संस्कृतीला, परंपरेला कमी व अशास्त्रीय लेखतात. म्हणून गणेशोत्सव शास्त्रानुसारच साजरा केला पाहिजे, असे आमची वसईचे म्हणणे आहे. म्हणूनच वसईत ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. धार्मिक सणांचे पावित्र्य राखण्यासंबंधी भाविकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच शाडूचीच मूर्ती वापरण्याचा आग्रह धरला जाणार आहे. त्याला भाविकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्लास्टर अन् कागदाच्या मूर्ती अशास्त्रीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:41 AM