डहाणू/बोर्डी : मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा केला जातो. मात्र प्लास्टिक उत्पादनाला बंदी असतानाही त्यापासून तयार केलेल्या पतंगांची बाजारात खुलेआम विक्री होत आहे. त्यामुळे शासनाने पर्यावरणदृष्ट्या घेतलेल्या निर्णयावर संक्रांत आली असून कायद्याच्या योग्य अंमलबजावणीअभावी प्रशासनाची पकड ढिली पडल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त पतंगबाजीला उधाण येते. पूर्वी केवळ कागदापासून बनविलेले पतंग तयार केले जात. मात्र काही वर्षांपासून वेगवेगळ्या आकारातील तसेच रंगाचे पतंग आणि मांजा बाजारात येत आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या महोत्सवाच्या माध्यमातून काईट शोच्या आयोजनातून नवनव्या रंगांच्या आणि ढंगांच्या पतंगांना मागणी वाढते आहे. त्यामुळे कलाकुसर आणि दजार्नुसार त्याचे कमी-अधिक दर असून त्याला ग्राहकांची चांगली पसंती मिळते आहे. दरम्यान, शासनाने पर्यावरणदृष्ट्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर त्यापासून बनविलेल्या वस्तू वापरण्यावर कायदेशीर बंदी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात बंदी असलेली उत्पादने बाळगणे, साठवणे आणि त्यांच्या विक्रीवर कायदेशीर कारवाई करून आर्थिक दंड वसूल केला जातो. मात्र या पतंगोत्सवाच्या काळात प्लास्टिकपासून बनविलेले पतंग तालुक्याच्या बाजारात सर्रास विक्री करताना दिसत आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असा प्रकार सर्रास सुरू असून त्यांची पकड ढिली झाल्यानेच नियमांचे उल्लंघन होऊन पर्यावरणाचा आणि कायद्याचा प्रश्न उपस्थित झाल्याचा आरोप नागरिकांनी केली आहे.उठ माणसा जागा हो, पर्यावरणाचा धागा हो!तुटलेल्या काचेच्या मांजाच्या दोरीने पक्षी मृत्युमुखी पडण्यासह वाहन चालवताना अपघात घडून वेळप्रसंगी नागरिकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे याबाबत जनजागृती निर्माण व्हावी म्हणून तालुक्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना त्या त्या शाळेच्या माध्यमातून ‘उठ माणसा जागा हो, पर्यावरणाचा धागा हो’ हा संदेश पर्यावरणमित्र बहुउद्देशीय संघटना राबवत असल्याची माहिती या संस्थेचे डहाणू तालुका अध्यक्ष दीपक दिसले यांनी दिली.