शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

‘पैंजणा’ने घातल्या हत्येच्या आरोपीला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 10:54 PM

मन्सूर रेहमान इसाअली ऊर्फ मन्सुर इसाअली शेखला केरळमधून जेरबंद

- सचिन सागरेकोपर-वसई रेल्वेट्रॅकजवळ कांदळवनात २९ मे २०१९ रोजी एक कुजलेला महिलेचा मृतदेह सापडला. सोबत केवळ एक चांदीचे पैंजण पोलिसांच्या हाती लागले. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कसून तपास केला आणि मन्सूर रेहमान इसाअली ऊर्फ मन्सुर इसाअली शेख या आरोपीला केरळमधून जेरबंद केले.आयरे गावातील कोपर-वसई रेल्वेट्रॅकजवळ २९ मे २०१९ रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या हत्या प्रकरणाचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनीही सुरू केला. मृतदेहाजवळ सापडलेले त्या महिलेच्या पायातील पैंजण हाच काय तो एकमेव धागा होता. अत्यंत आव्हानात्मक अशा या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मन्सुर रेहमान इसाअली ऊर्फ मन्सुर इसाअली शेख (४२) याला केरळमधील कोट्टायम येथून अटक केली.कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करून घटनास्थळाजवळ असलेल्या चाळीतील घरांमध्ये जाऊन मृत महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु, त्यांना यश आले नाही. जवळपास तीन महिने उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागत नव्हते. मात्र, गुन्हे शाखेने चिकाटी न सोडता तपास सुरूच ठेवला होता. मृत महिलेच्या पायातील चांदीचे पैंजण हाच एकमेव पुरावा होता. त्या पैंजणावर ज्वेलर्सच्या दुकानाचा स्टॅम्प असून त्यावर तमिळ भाषेत नाव लिहिल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तपास पथकाकरिता तोच आशेचा नवीन किरण होता.तमिळ भाषिकांना पैंजणावर असलेले नाव दाखवून त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न पथकाने केला. तेव्हा, पैंजणावरील तमिळ भाषेत ‘मलार’ असे लिहिल्याचा उलगडा झाला. ‘मलार’ याचा अर्थ ‘कमळाचे फुल’ असा होत असल्याचे पथकाला कळले. डोंबिवली, कल्याण, ठाणे परिसरांतील जवळपास सर्व ज्वेलर्स दुकानांमध्ये जाऊन पैंजणाचे फोटो दाखविण्यात आले. परंतु, अशा पैंजणांची कुठे विक्री करतात, याबाबतची माहिती पथकाला मिळाली नाही. मलार हे नाव तमिळ भाषेत असल्याने पथकाने तामिळनाडूतील ज्वेलर्सची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. तिरुवन्नामलाई शहरातील बशीर भाई या ज्वेलरच्या मालकाने त्यांच्या दुकानाचा स्टॅम्प चांदीच्या पैंजणावर वटविण्यात येतो, अशी माहिती दिली. त्या अनुषंगाने ठाणे, नवी मुंबई, मुंबई शहरातील बेपत्ता तमिळ भाषिक महिलांची माहिती प्राप्त करण्यास पथकाने सुरुवात केली. तसेच डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, मुंब्रा, दिवा, ठाणे, भांडुप, धारावी, चेंबूर, मानखुर्द या शहरांतील तमिळबहुल परिसरात जाऊन तपास सुरू केला. परंतु, प्रेताची ओळख पटली नाही.त्यानंतर, वरिष्ठांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगुन, पोलीस उपनिरीक्षक शरद पंजे, पोलीस नाईक शिर्के, पोलीस शिपाई रजपूत यांचे एक पथक तिरुवन्नामलाई येथे पाठविले. त्या ठिकाणी गेलेल्या पथकाने दुकानमालकाची भेट घेऊन दुकानातील ग्राहकांचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली. तेव्हा, दुकानातून जास्तीतजास्त मुस्लिम ग्राहक सोनेचांदीचे दागिने खरेदी करत असल्याचे निदर्शनास आले. याच माहितीच्या आधारे पथकाने तिरुवन्नामलाई शहरातील आसपासच्या खेडेगावांतील बेपत्ता महिलांची माहिती घेतली. मात्र, काहीच पत्ता न लागल्याने आसपासच्या शहरातील मुस्लिम लोकवस्ती असलेले विभाग आणि आसपासचे खेडे यांची यादी पथकाने तयार केली. त्यानुसार, तपास पथकाने मयत अनोळखी महिलेचा शोध घेण्याच्या दृष्टीने मयताचे फोटो, अंगावरील कपडे आणि पैंजण यासह गुन्ह्याच्या माहितीसह पोस्टर तयार करून तिरुवन्नामलाई शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या परिसरात लावले.अखेर, १६ मे २०१९ रोजी राधापुरम या गावातील खलील शेख यांनी त्यांची चुलत बहीण शाबीरा खान (५०, रा. दाणाबंदर, मुंबई) बेपत्ता असल्याचे पोलिसांना सांगितले. खलील यांच्याकडून बेपत्ता शाबीराचा भाऊ सुलतान शेख याचा मोबाइल नंबर पथकाने मिळवून संपर्क साधला. तसेच, असनपुरा गावातील शर्मिला खान हिच्याकडे पथकाने विचारपूस केली. तेव्हा, अनोळखी मृत महिला शाबीरा खान हीच असल्याचे तिने सांगितले. तसेच, पायधुनी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार १९ मे रोजी दाखल केल्याचे सांगितले.सहायक पोलीस निरीक्षक बी.एम. दायमा, पोलीस हवालदार मालशेट्टे, पोलीस नाईक पाटील, बांगारा, महिला पोलीस शिपाई रहाणे यांनी बेपत्ता शाबीरा खान हिचा मोबाइल नंबर मिळवून तिचा सीडीआर प्राप्त केला असता शाबीरा ही कोपर रेल्वेस्थानक येथे दि. १४ आणि १६ मे रोजी आल्याचे व त्यानंतर तिचा मोबाइल बंद असल्याचे उघड झाले. पायधुनी पोलीस ठाण्यातील बेपत्ता महिला शाबीरा हीच रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनोळखी मृत महिला असल्याची पोलिसांची खात्री पटली. मृत महिलेचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि खबरे यांच्याकडून मिळालेली माहिती व शाबीराच्या मोबाइलवर फोन करणाऱ्या व्यक्तींचे लोकेशन पडताळून पाहिले असताशाबीराच्या संपर्कात असलेला मन्सुर इसाअली शेख हा देखील दि. १४ आणि १६ रोजी कोपर रेल्वेस्थानक येथे आल्याचे आणि त्यानंतर मोबाइल बंद झाल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे शेख यानेच शाबीराची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय बळावला.घटनेनंतर लगेचच शेख दुसºया दिवशी पश्चिम बंगालमधील मालदा येथे गेल्याचे त्याचे नातलग, खबरे, रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही यावरून पथकाला समजले. शेखचा माग काढत पोलीस पश्चिम बंगालला गेले. मात्र, तो तेथून पसार झाल्याचे समजले. मोबाइल लोकेशननुसार शेख हा केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील पाईपाड येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. लागलीच संजू जॉन पथकासह पाईपाड येथे रवाना झाले. त्रिकोटीधाम पोलीस ठाण्याच्या मदतीने शेख याचा शोध सुरू केला. मन्सुर रेहमान इसाअली ऊर्फ मन्सुर इसा अली शेख (४२, रा. पाईपाड, केरळ. मूळ गाव- रुतुवा, प. बंगाल) हा वेश बदलून राहत असल्याचे उघड झाले. शेख बेसावध असताना पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला साळसूद असल्याचा आव आणणारा शेख खाकी वर्दीचा इंगा दिसताच ताळ्यावर आला. मृत शाबीरासोबत मन्सुर शेखचे अनैतिक संबंध होते. १४ मे २०१९ रोजी कोपर येथे राहण्याकरिता खोली पाहण्यासाठी शेख तिला घेऊन गेला. यावेळी, दोघांमध्ये वाद झाला होता. त्याचवेळी यापुढे शाबीराला न नांदवता तिची हत्या करण्याचे शेखने ठरवले होते. पुन्हा, १६ मे रोजी शेखने कोपर येथे शाबीराला बोलावले. दोघेही कोपर येथे आले. खोली पाहिल्यानंतर भोपर गावाकडून कोपर रेल्वेस्थानकाकडे जात असताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. शेखने शाबीराला धक्काबुक्की करून रेल्वेट्रॅकवरून खाली ढकलून दिले. शाबीराला संपवण्याच्या इराद्याने सोबत आणलेल्या चाकूने शेखने शाबीराचा गळा कापून तिची हत्या केली. त्यानंतर, पुरावा नष्ट करण्याकरिता शाबीराचे प्रेत रेल्वे ट्रॅकपासून २० ते २५ फूट अंतरावर कांदळवनाच्या झुडुपात टाकून दिले. शेखने पथकाकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. शेखला केरळ येथून अटक करून रामनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. रामनगर पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा प्राप्त करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सहआयुक्त सुरेश मेकला, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) दीपक देवराज, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-१) किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.