वसई, दि. 9- नालासोपारा रेल्वे स्टेशनमध्ये धावती लोकल पकडताना खाली पडून फरफटत जात असलेल्या एका महिलेला ओढून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. ट्रेनमधून पडणाऱ्या त्या महिलेला स्टेशनवर उभ्या असलेल्या आरपीएफच्या अधिकाऱ्याने वाचविलं. ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या घटनेचं थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं आहे. बोरीवलीला राहणारी ही महिला शुक्रवारी मुलीला घेऊन जात होती. रात्री 9.15 च्या सुमारास विरार स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 3 वरुन धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात होती. धावती लोकल पकडण्याच्या नादात प्लॅटफॉर्मवर फरफटत जाणारी महिला थोडक्यात बचावली आहे.
रेल्वेचे पोलिस उपनिरीक्षक गोपालकृष्णन राय यांनी हा प्रकार पाहिला आणि धावत जाऊन त्या महिलेला बाहेर काढलं. त्यामुळे ही महिला थोडक्यात बचावली. गोपाळकृष्ण राय असे त्या आरपीएफच्या अधिकाऱ्याचं नाव आहे. शुक्रवारी दहाच्या सुमारास राय नालासोपारा रेल्वे स्टेशनवर उभे होते. त्यावेळी धावती लोकल पकडताना एक महिला पडून गाडीसोबत फरफटत जाताना त्यांना दिसली. हा प्रकार बघून स्टेशनवर असलेल्या प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. गाडीने वेग पकडताच ती महिला प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मध्ये आली होती. हा प्रकार लक्षात येताच राय यांनी क्षणाचाही विलंब न लावता महिलेला वाचवण्यासाठी धाव घेतली. आणि गाडीखाली खेचल्या गेलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढलं.
लता महेश्वरी असं धावती लोकल पकडणाऱ्या त्या महिलेचं नाव आहे. बोरीवलीला राहणाऱ्या लता महेश्वरी आपल्या मुलीसह नालासोपाऱ्याहुन लोकल पकडून बोरीवलीला निघाल्या होत्या. त्यांची मुलगी लोकलमध्ये चढली. मात्र महेश्वरी गाडी पकडत असताना त्याचा पाय निसटल्याने त्या खाली पडल्या आणि गाडीसोबत फरफटत गेल्या. मात्र, राय यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन धाव घेऊन महेश्वरी यांचे प्राण वाचवले.