बोर्डी : झारखंड मधील पत्थलगढी चळवळीशी साम्य असलेले फलक डहाणू तालुक्यातील चिखले गावात लावण्यात आले आहेत. भारतीय संविधानातील कलमांचा आधार देत त्यात काही मजकूर चुकीचा लिहला आहे. या वादग्रस्त लिखाणामुळे समाजात वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकत असल्यामुळे हे फलक काढण्याचा आदेश घोलवड पोलिसांनी दिला आहे. तर ग्रामसभेचे आयोजन करून हे चुकीचे फलक बदलले जातील असे स्पष्टीकरण ग्रामपंचायतीने लोकमतशी बोलतांना दिले.या फलकावर भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुछेदात या गावचे क्षेत्र येत असल्याचा उल्लेख आहे. त्यामध्ये अनुछेद १३ (३) (क) नुसार या क्षेत्रातील रूढी परंपरा, प्रथांना कायद्याची ताकद लागू आहे. अनुछेद २४४ (१) (ख) नुसार अनुसूचीत क्षेत्रात भारतीय संसद वा राज्यसरकारच्या विधानसभेत तयार झालेले कोणतेही सामान्य कायदे लागू नाहीत. अनुछेद (१९) (५) अनुसूचीत क्षेत्रात आदिवासींव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना स्वतंत्रपणे फिरणे, निवास करणे, कायम स्थानिक होण्यास सक्त मनाई आहे. अनुछेद (१९) (६) नुसार आदिवासी व्यतिरिक्त बाहेरील व्यक्तीस व्यापार, व्यवसाय, धंदा, नोकरी करण्यास मनाई आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार लोकसभा ना विधानसभा, सबसे उंची ग्रामसभा, सर्वोच्च न्यायालयाच्या पी. रामारेड्डी विरुद्ध १९८८ नुसार या क्षेत्रात सरकार एका व्यक्ति प्रमाणे आहे, समता जजमेंट १९७७ नुसार येथे केंद्र किंवा राज्य शासनाची एक इंच सुद्धा जमीन नाही. सर्वोच्च न्यायालय निकाल महाराष्ट्र (५/१/२०११) नुसार आदिवासी हाच या देशाचा मूळ मालक आहे. ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी ग्रामसभेचे आयोजन केले आहे. त्यावेळी ठराव घेऊन फलक काढण्यात येतील.-अनिता कवटे, सरपंच, चिखले ग्रामपंचायतया फलकावरील संविधानाचा संदर्भ देऊन लिहिलेला काही मजकूर लक्षात आल्यावर, ग्रामपंचायत तसेच जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहे.- संभाजी यादव, प्रभारी अधिकारी,घोलवड पोलीस ठाणे
वादग्रस्त फलक हटविण्याचा पोलिसांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:36 PM