पालघर : पालघर (पूर्व) च्या नगरपरिषद हद्दीतील वेवुर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘पूनम लाईफ स्टाईल पार्क’ ह्या रहिवासी गृहसंकुलामध्ये बुक केलेल्या घरांचे (फ्लॅटचे) पैसे गेल्या दोन वर्षांपूर्वीं भरूनही त्याचा मुदतीत ताबा देण्यास नकार देणाऱ्या सुमित जवाहरलाल जैन ह्या बिल्डरसह त्याच्या अन्य भागीदारांवर पालघर पोलिसांनी फसवणूकीचा आणि महाराष्ट्र ओनरशीप फ्लॅट अॅक्ट सेक्शन ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला असला तरी ह्या प्रकरणातील आरोपीना अटक करू नये म्हणून पोलिसांवर व तक्रारदारांवर हितसंबंधियांकडून प्रचंड दबाव येतो आहे.आपले स्वप्नांतले घर विकत घेण्यासाठी दिवसरात्र मेहनत करून घाम गाळून जमा केलेली पुंजी, आणि कर्ज रूपाने जमा केलेल्या रक्कमेतून तक्रारदार तुकाराम विश्राम गार्डे रा. अंधेरी (मुंबई) व इतर २१ लोकांनी वेवुर येथील सर्व्हे न.६१/१,६६ पैकी ६७/१,व ६८ ह्या जागेवर उभारण्यात येणार्या पूनम पार्क ह्या रिहवासी संकुलात आपले फ्लॅट बुक केले होते.तक्र ारदार गार्डे ह्यांनी आपला वन बीएच के फ्लॅट ११ लाख ४४ हजार रु पयाला बुक करताना एकूण रक्कमे पैकी ८ लाख ८०० रु पयांची रक्कम हि भरली होती मात्र अजून बिल्डरांनी त्याला ताबा दिलेला नाही.पूनम पार्क या रहिवासी संकुलात बऱ्याच ग्राहकानी ७० ते ८० टक्क्यांहून अधिक पैसे या बिल्डरकडे जमा केले असतानाही त्या बदल्यात आजतागायत काम मात्र ५० ते ६० टक्केच झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे घरांचा ताबा त्यांना मिळू शकलेला नाही. तसेच या ताबा न मिळालेल्या घरांवर बिल्डरच्या संगनमताने इंडिया बुल्स ह्या गृह वित्तकंपनीमार्फत मोठे गृहकर्ज देण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांवरून समजते. त्यामुळे व्याजाची रक्कम वाढत असून भाड्याच्या घराचे भाडे असा दुप्पट फटका ग्राहकांना बसत आहे. असे असूनही याउलट बिल्डर सुमित जैन आणि त्यांच्या प्रतिनिधींकडून पत्र पाठवून अवास्तव पैशाची मागणी ग्राहकांकडून केली जात असल्याचे व ते न भरल्यास फ्लॅट कॅन्सल करू असे धमकी वजा आशय असलेले पत्र त्यांना बजावली जात असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. ग्राहकांनी बिल्डरसोबत केलेल्या कारारनाम्याप्रमाणे फ्लॅट बुक केल्यानंतर सन २०१३ सालात आपल्या घरांचा ताबा मिळणे अपेक्षित होते. मात्र २०१७ साल उजाडुन तब्बल चार वर्षाचा कालावधी उपटून जाऊनही घरांचा ताबा मिळालेला नाही.(वार्ताहर)
बिल्डरला वाचविण्यासाठी पोलिसांवर दबाव
By admin | Published: March 20, 2017 1:49 AM