मीरारोड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात पोलीस राष्ट्रध्वज घेऊन ७५ किलोमीटर धावले. पोलिसांची तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात पार पडली .
स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष असल्याने पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने मीरा भाईंदर आणि वसई विरार परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक घरात तिरंगा कार्यक्रमा अंतर्गत आज रविवारी ७५ पोलीस जवान हे प्रत्येकी १ किलोमीटर राष्ट्रध्वज घेऊन धावले आणि ७५ किलोमीटरचे तिरंगा रॅलीचे अंतर पूर्ण केले .
'तिरंगा रॅली रन' उत्तन पोलीस ठाणे व वसई पोलीस ठाणे या दोन ठिकाणावरून सकाळी ६ वाजता एकाच वेळी सुरू करण्यात आली होती . ह्या दोन्ही रॅलीचा समारोप वसई पूर्वेच्या नवजीवन फाटा येथील अप्पा मैदानात करण्यात आला. उत्तनच्या काका बाप्टिस्टा चौक पोलीस चौकी येथून सुरु झालेली तिरंगा रॅली राई , परशुराम चौक , स्वातंत्र्यवीर सावरकर चौक गोल्डन नेस्ट, शांती नगर , सृष्टी चौक सिग्नल , डेल्टा गार्डन चौक, काशीमीरा नाका- घोडबंदर खिंड, वरसावे पूल उलांडून वसई महामार्ग, सातिवली खिंड, तुंगारेश्वर पूल मार्गाने अप्पा मैदानात पोहचली . तर वसई पार नाका येथून सुरु झालेली रॅली अंबाडी नाका, वसई वाहतूक शाखा कार्यालय, बोळींज मस्जिद, जुने विवा कॉलेज, ओस्तवाल शाळा, तुळींज पोलीस ठाणे, रेंज नाका ह्या मार्गाने मैदानात पोहोचली.
या तिरंगा दौड मध्ये पोलीस आयुक्त सदानंद दाते, पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, पंकज शिरसाट सह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या शिवाय प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील शांतता समिती व मोहल्ला समिती सदस्य, पोलीस मित्र व नागरिकांनी तिरंगा रॅली दरम्यान धावणा-या पोलिसांचे स्वागत करत त्यांच्या उत्साह वाढविला. पोलिसांकडून या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतानाच नागरिकांना अखंडता, एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश दिला.