मीरारोड: डांबरी व रहदारीच्या रस्त्यांवर घोडे वा बैलांना गाडी जुंपून वेगाने पळवण्याचे प्रकार भाईंदरच्या उत्तन भागात केले जातात. अश्याच एका घोडागाडी भरधाव पळवणाऱ्यासह त्याच्या सहकाऱ्यावर उत्तन सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाईंदरच्या उत्तन तसेच मुंबईच्या गोराई व मानोरी गाव भागात घोडे व बैल पाळले जातात. विशेषतः नाताळ व काशीमीरा येथील संत जेरॉम चर्चच्या यात्रेवेळी उत्तन-गोराई घोडागाड्या व बैलगाड्या ह्या बेफाम रहदारीच्या रस्त्यावरून पळवल्या जातात. घोडे व बैलांना अमानुषपणे डांबरी रस्त्यावरून पळवले जात असल्याने अपघात देखील होतात. यात जनावरांना इजा होतेच शिवाय रस्त्यावरून ये-जा करणारे वाहने व लोकांच्या जीवाला सुद्धा धोका असतो.
या विरोधात कारवाईची मागणी सातत्याने होत असते. दरम्यान १८ जानेवारीच्या रात्री डोंगरी चेकपोस्ट येथे कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस निरीक्षक विजय सावंत यांना दोघेजण मानवी जीवितास धोका होईल अशा पद्धतीने भरधाव घोडागाडी हाकत असल्याचे दिसून आले. सावंत यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना न जुमानता त्यांनी घोडागाडी डोंगरीच्या दिशेने हाकून पळून गेले.
सावंत यांनी बीटमार्शल युनूस गिरगावकर यांना याची माहिती दिली असता गिरगावकर व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान राठोड यांनी आनंद नगर बस स्टॉप जवळ भरधाव येणारी घोडागाडी अडवली. घोडागाडी चालवणाऱ्या टायरन इग्नेशीस घरशी (२२) व मागे बसलेला ओलिस्टर डॉमनिक मेंडोन्सा (२३) ह्या दोघाही तरुणांना ताब्यात घेतले. दोघेही डोंगरी गावातले राहणारे आहेत. गिरगावकर यांच्या फिर्यादी वरून मानव जीवितास धोका व जबर दुखापत होईल याची जाणीव असताना देखील हयगयीने भरधाव घोडागाडी चालवली म्हणून दोघांवर उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.