हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर :पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालविवाहाचे लोन पालघर शहरात पोहचले असताना लग्न मंडपात दोन अल्पवयीन मुलांची लग्नगाठ बांधली जात असताना पालघर पोलिसांनी हे लग्न रोखून धरीत वधूला विरारच्या गुड शेफर्ड संस्थेकडे सुपूर्द केले आले. दरम्यान, दोन्ही कुटुंबे यवतमाळ येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल असून जिल्ह्याच्या पूर्व भागाकडील विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी आदी आदिवासीबहुल दुर्गम भागात अल्पवयीन मुला- मुलींची लग्न लावून देण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात आजही सुरू आहे. त्यातून कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हे बालविवाह रोखण्यासाठी अनेक वर्षांपासूनचे प्रयत्न फोल ठरत असताना पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियान या सामाजिक स्वास्थ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अभियानाला मोठे यश येत आहे. अनेक लोक या अभियानाला जोडले गेले आहेत. त्यातून अतिदुर्गम भागात आजही अनेक कुटुंबे स्वतः पुढे येत बालविवाहाला विरोध दर्शवत आहेत.
पालघर शहरातील न्यायालयाच्या शेजारी असलेल्या शांतीनगर येथे दोन अल्पवयीन मुलांचा विवाह लावला जात असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईनकडून पालघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अप्पासाहेब लेंगरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सपोनि मंजुळा शिरसाठ आणि उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे यांना घटनास्थळी पाठवले. त्या ठिकाणी दोन पोलिसांना साध्या वेशात पाठवून खातरजमा केल्यानंतर संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान हे लग्न लावण्याच्या दरम्यान लग्न गाठी बांधल्या जात असतानाच अचानक पोलिसांनी हस्तक्षेप करीत हे लग्न थांबवले.
दोन्ही कुटुंबे यवतमाळमधील
यवतमाळ येथील कुटुंबे असलेल्या या दोन्ही मुलांचे कागदोपत्री पुरावे तपासल्यानंतर नवरदेव मुलाचे वय १९ तर नवरी मुलीचे वय १८ असल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर गावाकडे अशीच लग्ने लावली जात असतात, असे सांगत दोन्ही अल्पवयीन मुलांना सोडण्याची वऱ्हाडी मंडळींची विनंती पोलिसांनी नाकारली आणि नवरी मुलीला महिला बालकल्याण समिती पालघर यांच्याकडे पाठविण्यात आले. त्या समितीच्या आदेशाने या मुलीला विरार येथील गुड शेफर्ड संस्था येथे पाठविण्यात आले. पुढील कारवाई पालघर पोलिस ठाण्याच्या सपोनी शिरसाठ या करीत आहेत.