-आशिष राणे
वसई : यंदा अधिक मासामुळे नवरात्र पुढे गेलं मात्र कोरोनाचे सावट व त्यात नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असला तरी यंदा दरवर्षी प्रमाणे नवरात्रोत्सवाची धामधूम अजूनही कुठे दिसत नाही. तर पारंपारिक मंडळांना अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्याची परवानगी असली तरी रास-दांडिया आदी प्रकारचा गरबा खेळण्यावर मात्र प्रशासनाचे निर्बंध कायम आहेत. किंबहुना नियम मोडून गृह संकुलांच्या आवारात गरब्याचे छुप्या पद्धतीने आयोजन करणारे व सोसायटी पदाधिकारी देखील पोलिसांच्या रडारवर असतील आणि त्यासाठी वसई विरार शहरात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याची पथके सज्ज केली असल्याची माहिती वसई विभागाचे डीसीपी संजय पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाउनमुळे गणेशोत्सवासह सर्वच सणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. नवरात्रोत्सव व गरब्याचा वसई विरार शहरात व ग्रामीण भागात ही एक वेगळाच उत्साह असतो. मात्र, लॉकडाउनमधून मिळालेली शिथिलता पाहता नवरात्रोत्सवात नागरिक एकत्र आल्यास गणेशोत्सवानंतर आलेल्या करोना लाटेसारखी लाट पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वसई विरार पोलिस आयुक्तालयाची यंत्रणा यावेळी अधिक सतर्क राहणार आहे.यामध्ये तक्रार च काय तर साधा व्हिडीओ देखील प्राप्त झाला तरी पोलीस कारवाई करतील असे ही डीसीपी पाटील यांनी सांगितले.
दरम्यान वसई विरार मधील सार्वजनिक मंडळे सामाजिक जबाबदारी जपताना दिसत असली तरी शहरातील शेकडो लहान, मोठ्या गृह संकुलांनी सामाजिक भान जपून यंदा साधेपणाने उत्सव करणे अपेक्षित आहे. कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये,यासाठी गृहसंकुलाच्या आवारातील गरब्याला बंदी असून गृह संकुलांत कोरोनाचे निर्देश तोडून गरब्याचे आयोजन केल्यास आयोजक व खास करून त्या त्या हौसिंग सोसायटीच्या कार्यकारी संचालक मंडळावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा डीसीपी संजय पाटील यांनी दिला आहे. तसेच डीजे, साऊंड व बेंजो अथवा ढोल पथकांनाही याबाबत बजावण्यात आले असल्याचेही डीसीपी पाटील यांनी सांगितले.
नियमांकडे दुर्लक्ष करून कोरोनाचा संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्ती तसेच गरब्याचे नियमबाह्य आयोजन करणारी गृहसंकुले आणि खास करून सोसायटीच्या आवारात गरबे होणारच नाही याची दक्षता घेणं यांबाबत सतर्क पदाधिकारी व नागरिकांनीही थेट पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन देखील डीसीपी संजय पाटील यांनी केले आहे.