लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड - मीरा रोडच्या शांती नगर सेक्टर ५ मधील दोन इमारतीच्या रहिवाशांनी राजकीय पक्ष व राजकारण्यांना इमारतीच्या आवारात येण्यास बंदी घातली आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ह्या दोन्ही इमारतींमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असताना राजकारण्यांनी केवळ पोकळ अश्वासनेच दिल्याने लोक संतप्त झाले आहेत. (flood water problem not solved by politicians, Mira road ShantiNagar Society banned there entry. )
मीरा रोडची शांतीनगर ही सर्वात जुनी व शहरातील सर्वात मोठी वसाहत आहे. यातील सेक्टर ५ मधील ४ विंग व ८० सदनिका असलेल्या भूमिका आणि गोदावरी या दोन गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी राजकारण्यांना प्रवेश बंदी जारी केली आहे. तश्या आशयाचे फलक इमारतींच्या दर्शनी भागांवर लावण्यात आले आहेत. ह्या इमारतीच्या आवारात व तळमजल्यावरील घरांमध्ये दर पावसाळ्यात पाणी साचते. पाणी साचण्याचे प्रकार हा अनेक वर्षांपासून होत असताना गेल्या तीन-चार वर्षांपासून तर पाणी साचण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे.
पावसाळ्यात तळमजल्यावर असलेल्या घरांमध्ये तर तीन फुटाच्या आसपास पाणी साचत आहे. त्यातच शौचालयातील मैला व सांडपाणी हे उलट दिशेने येऊन घरांमध्ये पसरते. साचलेले पाणी तासनतास कमी होत नाही. काहीजण तर घरातच लहान मोटर लावून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात.
घरात साचणाऱ्या पाण्यामुळे फर्निचर, अंथरूण, कपडे, फ्रिज व धान्य आदी साहित्य खराब होऊन मोठे नुकसान होत आहे. लोकांचे हाल होत आहेत. तळमजल्यावरील घर खरेदी करायला कोणी येत नाही. काही रहिवाशी तर मिळेल ती किंमत घेऊन घर विकून गेले.
शांतीनगर सेक्टर ५ मधील या दोन इमारतींच्या समोर शीतल नगर आहे. या दोन्ही वसाहत दरम्यान सार्वजनिक रस्ता आहे. या ठिकाणी असलेल्या नाल्याची उंची कमी करून रस्त्याच्या समांतर घेतल्याने पाणी वेगाने आमच्या घरात शिरते असे भूमिका व गोदावरी इमारतीतील राहिवाश्यांचा दावा आहे. स्थानिक नगरसेवकां पासून महापौर, आमदार, आयुक्त आदींना निवेदने - गाऱ्हाणी मांडून झाली आहे. पण पाणी तुंबण्याचे काही थांबलेले नाही
वास्तविक शीतल नगर व शांतीनगर या जुन्या वसाहती आता सखल झाल्या आहेत. महापालिकेने रस्ते व गटारे यांचा इमारतींच्या उंचीशी समतोल न ठेवता ते उंच केले आहेत. त्यातच पावसाळ्यात येथील पाणी जाण्याचे नाले हे अतिशय अरुंद आहेत. या नाल्याची साफसफाई सुद्धा काटेकोरपणे केली जात नाही. पुढे या नाल्यातील पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक तेवढ्या रुंदी आणि खोलीचे नालेच बांधण्यात आलेले नाहीत.
गणेश पै (स्थानिक रहिवाशी) - गेल्या पंचवीस वर्षांपासून पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या प्रकाराने आम्ही त्रासलो आहोत. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून शीतल नगर येथील नाल्याची उंची कमी केल्याने आमच्या कडे पाणी वाहून येऊन पाण्याची पातळी वाढली आहे. जेणेकरून रहिवाशांना नुकसान व अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. नेते मंडळी केवळ पोकळ आश्वासन देत असल्याने आता रहिवाशांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच आम्ही सर्व रहिवाशांनी राजकारणी व निवडणुकीत उमेदवार आदींना इमारतीच्या आवारात प्रवेश करण्यासाठी मनाई केली आहे.