पालघर : विकासाच्या दृष्टीने सर्वांना एकत्र करून पालघर जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर आणण्याऱ्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असून प्रशासन पारदर्शकपणे काम करेल मात्र विकासकामामध्ये कोणी राजकारण आणू नये असे पालघर जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सांगितले.पालघर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासनावर चांगला ठसा उमटवतांना जिल्ह्यातील २ हजार २०५ शाळांचे डिजिटलायझेशन करण्याचा बहुमान मिळविला. शनिवारी त्यांच्याकडून निधी चौधरी यांनी पदभार स्विकारल्यानंतर आज पत्रकारांशी वार्तालाप केला. आपणास आरोग्य व शिक्षण या दोन क्षेत्रामध्ये भरीव कार्य करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी पत्रकारांचे सहकार्य आपणास अपेक्षित असून प्रशासन काम करीत नसेल, काही चुका असतील तर त्या आमच्या निदर्शनास आणून द्या, त्या नक्कीच सुधारण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी या सन २०१२ मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊन आपएएस झाल्या असून त्यांनी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियामध्ये मॅनेजर म्हणून ६ वर्षे काम केले आहे. तसेच इंडियन आॅडीट अॅण्ड अकाऊंट सर्व्हीसमध्ये एक वर्ष काम केले आहे. त्यानी इंग्रजीमध्ये एमएची पदवी घेतली असून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनची पदवीही प्राप्त केली आहे. सध्या त्या पब्लिक अॅडमिनीस्ट्रेशनमध्ये पीएचडी करीत आहेत. त्या पेण येथे उपविभागीय प्रांताधिकारी असताना त्यांनी बेकायदेशीर बांधकामे व सरकारी, राखीव जागांवरील अतिक्रमणांच्या विरोधात मोहिम उघडून २ हजाराच्यावर अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. (वार्ताहर)
विकासात राजकारण नको-चौधरी
By admin | Published: May 04, 2016 12:52 AM