वाडा : नगरपंचायत निवडणूकी करीता बुधवारी मतदान होत असून मतदानाच्या पूर्वसंध्येला व रात्री आता छुपा प्रचार करण्यावर सर्वच पक्षांनी भर दिला आहे. तो कसा रंगतो आणि मतदार त्याला कितपत साथ देतात यावर या निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. येथील १७ प्रभागांमध्ये होत असलेल्या निवडणूकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.मतदाना दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणून पोलीस प्रशासनाने दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुक ड्या व ६८ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. नगराध्यक्षपदासाठी थेट मतदान होत असल्याने सर्वच उमेदवारांची प्रतिष्ठा पणला लागली आहे. नगराध्यक्षपदाकरीता एकूण पाच उमेदवार रिंगणात असून नगरसेवकपदासाठी ७९ उमेदवार आपले नशीब अजमावीत आहेत. निवडणुकीच्या प्रचाराची मुदत मंगळवारी संपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी उघड प्रचार थांबवला आहे. त्याचप्रमाणे जागोजागी लागलेले उमेदवाराचे फलकही राजकीय पक्षांनी आचारसंहिता पाळत स्वत: हून उतरवले आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी मोहन नळदकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्यक्ष मतदानाकरीता मतदान केंद्रावर १२९ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना मतदानासाठी आवश्यक असणारी मतदार यंत्रे व अन्य साहित्याचे वाटप मंगळवारी तहसील कार्यालयात करण्यात आले असून कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. हे मतदान शांततेत पार पडेल असा विश्वास निवडणूक अधिकाºयांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला आहे.निकालाची प्रतिक्षा १८ डिसेंबर पर्यंतवाडा नगरपंचायत निवडणूकीची १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र, डहाणू व जव्हार येथील मतदान पुढे ढकलल्याने ते १७ डिसेंबरला होत आहे. त्यामुळे त्या निवडणुकीवर वाड्याच्या निकालाचा परिणाम होऊ नये म्हणून वाडा नगरपंचायतीची मतमोजणी निवडणूक आयोगाने १८ डिसेंबरला करण्याचा आदेश दिला आहे.पोलिसांचे संचलनबुधवारी होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थे बाबत नागरिकांमध्ये अधिक जागृती व्हावी तसेच कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाडा पोलिसांनी संपूर्ण शहरात दंगल विरोधी पथकासह संचलन केले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे.
वाडा नगरपंचायतीसाठी आज मतदान, नगराध्यक्षपदासाठी महिलांतच चौरंगी सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 2:51 AM