पालघर/नंडोर: कारखान्यातील सांडपाणी बेकायदेशीर रित्या गावच्या नाल्यात सोडल्यानंतर ग्रामपंचायतीने नोटीस दिल्यानंतरही कंपनीमार्फत राजरोसपणे सांडपाणी बाहेर सोडले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून प्रदूषण नियंत्रक मंडळ याची दखल घेणार काय असा सवाल एका बाजूला विचारला जात आहे. ग्रामपंचायत देखील फक्त नोटिस पाठवून गप्प बसणार काय असाही प्रश्न उपस्थित होेत आहे. शेलवली ग्रामपंचायत हद्दीतील विनोद कुक वेअर सांडपाणी उघडयावर सोडून परिसर प्रदूषित करत असलचे अलीकडेच लोकमतने निदर्शनास आणून दिले होते त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने या कंपनीला १३ मे रोजी हे सांडपाणी त्वरीत बंद करण्यासाठीची नोटिसही बजावली होती. त्याला पंधरा दिवस उलटले तरीही ही कंपनी बिनधास्तपणे हे सांडपाणी सोडतच आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्या नोटिसीलाही ही कंपनी भीक घालत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. ते वेळीच बंद न केल्यास पावसाच्या पाण्यात हे सांडपाणी मिसळून लोकांच्या शेतात शिरेल व ती नापिक होतील. ग्रामपंचायत प्रशासन तेंव्हा जागी होणार का? तोपर्यंत काळ निघून गेला असेच किंवा ग्रामपंचायतीला हि कंपनी जुमानत नाही असा युक्तीवादही येथे केला जात आहे.
प्रदूषित पाणी वाहतच आहे
By admin | Published: June 02, 2016 1:11 AM