वाडा : नगरपंचायतीमार्फत सुरू असलेला पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ असून नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने अनेक कुटुंबांना मिनरल वॉटर (जार) वर अवलंबून रहावे लागते आहे. त्यामुळे दुकानांमध्ये जार घेण्यासाठी गर्दी दिसते आहे.गढूळ पाण्यामुळे शहरातील साथीच्या रोगांचे प्रमाण वाढलेले दिसते. थंडी, ताप, जुलाबाची लागण अनेकांना झाली आहे. शहरातील दवाखान्यांमध्ये रुग्ण दिसत आहेत. दरम्यान, अतिवृष्टीमुळे विहिरींमधे गाळ गेल्याने पाणी अशुद्ध झाले असून यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. यासाठी तत्काळ विहिरींमधील पाणी काढून त्या साफ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी शनिवारच्या आढावा बैठकीत दिल्या होत्या. पाण्याने रोगराई उद्भवल्यास तालुका आरोग्य अधिकारी आणि पाणीपुरवठा विभाग जबाबदार राहील असेही ठणकावले होते.या संदर्भात नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा विभाग अभियंत्याशी संपर्क साधा. तेच तुम्हाला याविषयी अधिक माहिती देतील. मी सध्या बाहेर आहे.- गीतांजली कोलेकर,नगराध्यक्षा, वाडाजलशुध्दीकरण यंत्रणा बिघडल्याने सध्या दूषित पाणी पुरवठा होत आहे. लवकरच ते दुरूस्त करू शुध्द पाणी पुरवठा केला जाईल. तात्पुरता उपाय म्हणून नागरिकांना क्लोरीन बॉटलचे वाटप करून पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नवीन जलशुध्दीकरण यंत्रणा बसविण्याच्या दृष्टीने देखील आमचे प्रयत्न सुरू आहेत.- जाग्रती कालन, सभापती,पाणी पुरवठा विभाग, वाडा नगरपंचायतफिल्टर प्लॅन हा साधारणपणे २० वर्षांपूर्वीचा आहे. ही पाणी शुद्धीकरण यंत्रणा नसून ती पाणी गाळून जाण्याची गाळणी आहे. त्यातील वाळू बदलण्याचा एकदा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही.- बंड्या सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते
वाड्यात दूषित पाण्याचा पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 1:41 AM