वसई : मुंबईहुन वसईकडे येणाऱ्या मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका पोलो कारला अचानकपणे भीषण आग लागली, मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास वसईजवळील किनारा धाब्याजवळ ही घटना घडली.
स्थानिक व इतर वाहनचालकांनी प्रसंगावधान दाखवल्याने गाडीतील सर्वजण बचावले असल्याचे सुत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसईकडे येणाऱ्या एका लाल रंगाच्या पोलो गाडीच्या इंजिनातून धूर येऊ लागला. काही काळात या गाडीच्या बोनेटने पेट घेतला असता चालकाने कार उभी केली. स्थानिकांनी इतर वाहनचालकांच्या मदतीने गाडीतील लोकांना बाहेर काढले. त्यानंतर गाडीला लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
या घटनेनंतर काही काळ मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, बचावकार्य व त्यात पावसाची रिमझिम सुरूच होती. घटनास्थळी अग्निशमन दल किंवा वाहतूक पोलीस वेळेत दाखल न झाल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली.