शशी करपे, वसईपाचूबंदर येथील महापालिकेच्या स्मशानभूमीला रात्री आठ वाजताच टाळे लावले जात असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. सदर स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीचे काम महिला बचत गटाकडे सोपवण्यात आल्यापासून आठ वाजता स्मशानभूमी बंद केली जात असल्याने अंत्यसंस्कार करण्याऱ्यांना रात्री गेटबाहेर थांबावे लागत आहे.वसई विरार महापालिकेच्या सर. डी. एम. पेटीट हॉस्पीटलमध्ये गेल्या आठवड्यात चंद्रीका शर्मा ही महिला प्रसुत झाली. मात्र, प्रसुतीनंतर लगेचच बाळाचा मृत्यु झाला. यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते. हॉस्पीटलमध्ये जबाबदार डॉक्टर नव्हते. त्याठिकाणी असलेल्या नर्सने मृत बाळ वडिलांच्या ताब्यात दिले. मृत बाळ नवजात असल्याने वडिल आपल्या नातेवाईकांसह रात्री बाराच्या सुमारास पाचूबंदर स्मशानभूमीत गेले. मात्र, स्मशानभूमीचे गेट बंद होते आणि त्याला टाळे लावण्यात आले होते. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हातात घेऊन त्या लोकांना तब्बल तीन तास गेटबाहेर ताटकळत बसून रहावे लागले. गेल्या चार महिन्यातील ही तिसरी घटना. रात्री आठनंतर अंत्यसंस्काराला गेलेल्या दोन मृतदेहांना अशीच वाट पहावी लागली होती. दोन महिन्यांपूर्वी तर संतप्त लोकांनी स्मशानभूमीचे टाळे तोडून अंत्यसंस्कार उरकले होते. याची तक्रार आयुक्त सतीश लोखंडे यांच्याकडे दोन वेळा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी आश्वासन देऊनही कोणतीच कारवाई झाली नाही, अशी माहिती भाजपाचे वसई शहर युवकचे उपाध्यक्ष सुशील ओगले यांनी दिली. तत्कालीन वसई नगरपरिषेदपासून पंधरा वर्षे याठिकाणी ठेका पद्धतीवर एक सुरक्षा रक्षक नेमण्यात आला होता. त्याला जवळच एक खोलीही बांधून देण्यात आली होती. सुरक्षा रक्षक चोवीस तास असल्याने रात्री अपरात्री स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता येत होते. पण, आता सुरक्षा रक्षक काढून टाकण्यात आला आहे. त्याऐवजी स्मशानभूमीची देखभाल दुरुस्तीचे काम एका महिला बचत गटाला देण्यात आले आहे. त्यामुळे रात्री आठ वाजतानंतर सुरक्षा रक्षक नसल्याने स्मशानभूमीच्या गेटला टाळे लावले जाते. त्यामुळे पाचूबंदर परिसरातील गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतो. हा प्रकार अतिशय गंभीर असून त्याची सखोल चौकशी केली जाईल, असे उपमहापौर उमेश नाईक यांनी दिले. तसेच याप्रकरणी लक्ष घालून असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेण्यात यावी असे प्रभाग समिती आयचे सभापती प्रवीण शेट्टी सूचना दिल्या.
पाचूबंदर स्मशानभूमीला रात्री टाळे
By admin | Published: March 16, 2017 2:42 AM