शौकत शेख डहाणू : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या डहाणू- नाशिक राज्यमार्गासह प्रमुख जिल्हा मार्गावरील एकूण ७० लहान मोठ्या पूलांपैकी २५ पूल व तेवढेच साकव अरुंद व जीर्ण झाल्याने ते वाहतुकीस धोकादायक झाले आहेत. त्यांची तत्काळ दुरूस्ती करण्याचे गरजेचे असतांना संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कोकणातील महाड येथील सावित्री पूलाच्या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने राज्यभरातील ब्रिटीशकालीन, मोडकलीस व धोकादायक स्थितीत असलेल्या पूलाची तत्काळ माहिती देण्याचे आदेश सा.बां. विभागाला दिले. त्यानंतर संबंधित विभागाने शासनाला माहिती सादर केली. डहाणूत ब्रिटीशकालीन पूल साकव नसले तरी डहाणू - नाशिक राज्यमार्गाबरोबरच झाई, बोर्डी, चिंचणी, वानगाव, आशागड, आंबेसरी, मोडगाव, उधवा-३, बोराडे, उमरोळी, तलवाडा , कासा, सायवन -४, घोलवड, कोसबाड, कंकाडी - ५, सरावली सावटा, डेहणे पळे-६, ऐना दाभोण-७, वसा, करजगाव-८, वानगाव, गासनगाव, चंडिगाव अशा एकूण २५२ कि.मी.च्या रस्त्यावर एकूण ७० पूल, साकव आहेत. त्यापैकी बहुसंख्य पूलाची अवस्था दयनीय झाल्याने त्याची वेळीच दुरूस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. डहाणू, चारोटी राज्यमार्गावरीरल पाच मोठे पूल धोकादायक आहेत. २०१५ ला या राज्यमार्गाचे २० कोटी खर्चून रुंदीकरण केले. मात्र पूल जैसे थे असल्याने समोरासमोर वाहने आली की अपघात होतात. वधना पूल तसेच डहाणू रेल्वेचा ओव्हरब्रीज कमकुवत झाल्याने सावित्री पूलाप्रमाणे मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली आहे.>हे तर मृत्यूचे सापळेडहाणू-नाशिक राज्यमार्गावरील सरावली, गंजाड येथील पूलाचे कठडे मोडकळीस आले आहे. पावसाळ्यात गंजाड, वरोरा, चिंचणी, कलोवली, वानगाव इत्यादी पूलावरून पाणी वाहत असते. मुसळधार पाऊस झाला की पूल, साकव पाण्याखाली जात असल्याने गावांचा संपर्क तुटतो. पूलावरून जाण्याच्या प्रयत्नात ग्रामस्थ वाहून मृत्यूमुखी पडतात. तरीही सा.बां. पूल, साकवांची दुरूस्ती करीत नाही. नवीन पूल बांधत नाही. त्यामुळे ते मृत्यूचे सापळे ठरले आहे.
पंचवीस पूल धोकादायक, डहाणू- नाशिक राज्य मार्गावरील पूल झाले जीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 3:10 AM