तलासरी : आदिवासीबहुल डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या चळणी गावाकडे जाणाऱ्या मुख्य पुलाची उंची खूप कमी आहे. तसेच या घनदाट जंगली भागात जास्त पाऊस पडत असल्याने हा पूल पाण्याखाली जाताे, त्यामुळे गावाचा संपर्क तुटतो. चळणीसह इतर सुमारे १३ गावांचाही बाजारपेठेशी संपर्क तुटतो. त्यामुळे नवीन पूल बांधण्याची किंवा जुन्या पुलाची उंची वाढवण्याची वारंवार मागणी होत आहे, मात्र त्याकडे बांधकाम व जिल्हा परिषद दुर्लक्ष करीत आहेत.
चळणी येथे सायवन-जव्हार रस्त्यावर सोनाय नदीवर हा २० वर्षांपूर्वी पाइप टाकून पूल बांधला होता. तसेच २०१९ मध्ये याचे पुन्हा काम करण्यात आले. सध्या या पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाच्या वरच्या भागावरील सिमेंट काँक्रिटचा अर्धा भाग पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात तुटून नदीपात्रातच पडल्याचे दिसते. तसेच पुलाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात या पुलावरून पाणी जात असल्याने तिलोंडा, पिंपळशेत, खरोडा, चांभारशेत, माढविहरा, कुंड, ओझर आदी गावांतील २० ते २५ पाड्यांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. सायवन ही या परिसरातील गावांसाठी प्रमुख बाजारपेठ आहे. येथे बाजारपेठ, बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने अनेक गावांचा संपर्क जोडणारा हा पूल महत्त्वाचा आहे. त्यामुळे नवा पूल बांधण्याची किंवा उंची वाढवण्याची ग्रामस्थ मागणी करत आहे.
सायवन रोड ते चळणी गावाला जोडल्या जाणाऱ्या पुलाची दुरवस्था झाली असून त्याची डागडुजी न करता त्या पुलाची उंची वाढवण्यात यावी व नव्याने बांधणी करण्यात यावी.- संदीप गिंभल ग्रामस्थ
सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामपंचायतीशी बोलणं करून स्थानिक स्तरावर ग्रामपंचायत निधीमधून पुलाची डागडुजी करण्यात येईल. नवीन पुलाच्या कामासाठी लवकर निधी उपलब्ध करू.- नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद डहाणू