नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मरणानंतरही मृतदेहांना यातना भोगाव्या लागत असून अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.महानगरपालिकेच्या उदासीनतेमुळे पेल्हार गावातील वनोठापाडा येथील स्मशानभूमी शेवटच्या घटका मोजत आहे. स्मशानभूमीच्या भिंती तुटलेल्या, बसण्यासाठी जागा नाही, पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब, पाण्यासाठी शेजारी असलेल्या घाणेरड्या पाण्याचा वापर, दिवाबत्तीची सोयही कोमात, स्मशानभूमीत कोणीही सरकारी कर्मचारी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना लाकडे स्वतः रचावी लागतात, अशा अनेक प्रश्नांमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी गडग्याचा पाडा, इंदिरा वसाहत, वाकणपाडा, पेल्हार, वनोठा पाडा, वसई फाटा, अवधूत आश्रम, डोंगरीपाडा या परिसरातील नागरिक येतात. वाॅर्ड नंबर-१ आणि वाॅर्ड नंबर-४३ या दोन्ही वाॅर्डच्या सीमेवर ही स्मशानभूमी असल्याने आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, या परिसरात अंदाजे १० ते ११ हजार मतदार असून त्यांना सुविधा मिळत नसल्याने या स्मशानभूमीची डागडुजी केली नाही तर आगामी वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत बहिष्कार टाकणार असल्याचे स्थानिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. मेल्यानंतरही लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा त्रास असून कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत लक्ष दिले नाही. कोणीही मनपाचा कर्मचारी या ठिकाणी हजर नसतो. - राजू दास, ग्रामस्थया स्मशानभूमीबाबत माहिती घेतो आणि तिची दुरवस्था झाली असेल तर तातडीने डागडुजी करण्यात येईल.- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिकाधोकादायक छताखाली होतात अंत्यसंस्कारमहानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या स्मशानभूमीची अवस्था इतकी खराब आणि धोकादायक झाली आहे की अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना भीती वाटते. त्याचबरोबर संरक्षक भिंतीना मोठमोठ्या भेगा पडल्या असून आसन व्यवस्था असलेली भिंत कोसळलेली आहे. बाथरूमचे तिन्ही दरवाजे गायब असून त्यांच्या भिंतीना तडे गेलेले आहेत. विजेचा पोलही वाकलेल्या अवस्थेत आहे.
पेल्हार येथील स्मशानभूमीची दुरवस्था; मरणानंतरही यातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 12:54 AM