पालघर : तालुक्यातील लालठाणे ग्रामपंचायत हद्दीत व परिसरात राशी पूनम जातीचे बियाणे गौरी ग्रामसंघ बचत गट लालठाणेकडून शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते. हे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले असून शेतकऱ्यांच्या शेतात पिकेच उगवली नसल्याने संबंधित दोषींवर कारवाई करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकºयांनी आपल्या शेतात टाकलेले हे बियाणे घारपुरे कृषी सेवा केंद्र कासा येथून आदर्श प्रभात केंद्र नंडोरे (पालघर) यांनी खरेदी केले. सदर बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
शेतकºयांनी खरेदी केलेल्या या बियाण्यांपैकी ४० ते ५० टक्के बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वितरीत करण्यात आलेल्या बियाण्यांवरील बॅच नंबर ए ०९४२३ आणि ए ०९४३५ असे आहेत. तर पेरणी केलेल्या बियाण्यांच्या बॅगवर बॅच नंबर ८५९०३६ असून त्यामध्ये विसंगती दिसून येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
या बोगस भात बियाण्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांच्या वतीने कृषी विकास खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य महेंद्र अधिकारी, जि.प. सदस्य अनुश्री पाटील व पंचायत समिती सदस्या सीमा पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात घारपुरे कृषी सेवा केंद्राच्या दूरध्वनी नंबरवर अनेक वेळा संपर्क साधूनही फोन उचलण्यात आला नाही.तीन महिने कोरोनासारख्या महाभयानक संकटाचा सामना करून थोडाबहुत पैसा बियाणे घेण्यासाठी वाचवून ठेवला होता. परंतु बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याने संबंधित दोषींवर कारवाई करावी. - कमलाकर लाबड, शेतकरी, लालठाणे