नंदकुमार टेणी पालघर : भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांची या मतदारसंघात लोकप्रियता किती अफाट होती हे या पोटनिवडणुकीने सिद्ध केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत कोणत्याही झगमगाटी प्रचाराविना लढविलेली ही निवडणूक वनगा यांनी ५३३२०१ इतक्या प्रचंड मताने व २३९५२० इतक्या मताधिक्याने जिंकली होती. हे ध्यानी घेता या पोट निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पडलेली २७२७८२ ही मते आणि त्यांना मिळालेले २९५७२ हे मताधिक्य एकदम खुजे वाटते. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचा उमेदवार नव्हता, तो आता होता. त्यामुळे भाजपाच्या गावितांना मिळालेली २७२७८२ व शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना पडलेली २४३२१० या दोन्ही मतांची बेरीज केली तरी ती ५१५९९२ इतकी होते. म्हणजे या मतांपेक्षाही वनगांनी २०१४ मध्ये मिळविलेली ५३३२०१ ही मते प्रचंड ठरतात. केवळ कामाच्या आणि लोकप्रीयतेच्या जोरावर ते विजयी झाले होते. हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे.अशा परिस्थितीत अवघ्या सहाच महिन्यांनी विधानसभेच्या निवडणूका झाल्यात. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात किमान निम्म्यातरी मतदारसंघात भाजप विजयी होईल, अशी भाजपची अटकळ होती. परंतु तसे झाले नाही. जनतेने नालासोपारा, वसई, बोईसर इथे बविआचे क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, विलास तरे यांना विजयी केले तर पालघरमध्ये कृष्णा घोडा, डहाणूत पास्कल धनारे आणि विक्रमगडमध्ये विष्णू सवरा यांना विजयी केले. म्हणजे सहा पैकी चार मतदारसंघात जनतेने भाजपेतर पक्षांना विजयी केले होते.कृष्णा घोडा यांच्या विजयानंतर अल्पावधीतच त्यांचे निधन झाले त्यानंतर त्यांचे पुत्र अमित घोडा यांना सेनेने उमेदवारी दिली. जनतेने त्यांनाही विजयी केले. याचाच अर्थ लोकसभेत मोठा विजय मिळाला म्हणजे त्या लोकसभा मतदारसंघात असलेल्या विधानसभा मतदारसंघात विजय मिळेल असे गृहीत धरण्याची आवश्यकता नाही. असेही या निवडणुकीने स्पष्ट केले होते.
वनगांची लोकप्रियता सिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 12:02 AM