जव्हार : या नगरपरिषदेसाठी रविवारी मतदान होणार असल्याने शनिवारी सर्वच पक्षानी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या झालेल्या जाहिर सभा अन एकंदरीतच जव्हार मधील मतदारांचा कौल पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात सरळ लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असून आता मतदारांचा कल अपक्षां ऐवजी पक्षांना मत देण्याकडे असल्याचे संकेत मिळत असून आता फक्त कौल कुणाला मिळणार हे सोमवारी कळणार आहे.या निवडणूकीत अपक्षांसहीत पाच पक्षांचे उमेदवार उभे ठाकले असून सुरवातीला चौरंगी लढतीची शक्यता येथे दिसून येत होती मात्र कॉंग्रेस आणि भाजपने निर्माण केलेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक त्यांच्या उमेदवारांना लढवता आलेली नाही तर मुस्लीम मतांची बेगमी करण्यासाठी जव्हार प्रतिष्ठानने सेक्युलर चेहरा दाखविला असतानांच भाजपाशी युती केल्याने ते लढतीतून बाहेर पडल्यासारखे झाले आहेत तर कॉंग्रेसला सर्व जागांवर उमेदवार देता न आल्याने त्यांचे गणित चुकले आहे.यामुळे सध्या आता सेना आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस दिसत असून प्रभागनिहाय आणि नगराध्यक्ष लढतीततही सेना राष्ट्रवादी हेच प्रामुख्याने उभे ठाकले आहेत. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार वैयक्तिक पातळीवर घसरल्याने जव्हारकर मात्र अवाक झाले होते तर यासगळ्यात सर्व उमेदवारानी कंबर कसलेली असून परगावी कामानिमित्त स्थलांतरित झालेल्यानांही मतदानासाठी येथे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सरळ लढतीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 3:31 AM