- राहुल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : पावसाळा सुरु होतांच या ही वर्षी या शहरातील रहिवाशांना गढुळ व माती मिश्रीत पाण्याचा पुरवठा सुरु झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अव्वाच्या सव्वा पाणीपट्टीची वसूली झाल्यानंतरही परिस्थिती बदललेली नाही. प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करुन उभारण्यात आलेली फिल्टर योजना अपुरी पडत असल्याने अभ्यास न करता पैशाची उधळपट्टी केल्याचा आरोप होत आहे. फिल्टर योजनद्वारे फक्त उन्हाळयातच स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असतो. पावसाळा सुरु होताच नळाद्वारे येणारे पाणी गढूळ व मातीमिश्रीत असल्याने ते तोंडात घेण्यासही भीती वाटते असल्याने अनेकांनी घरोघरी फिल्टर लावले आहेत. मात्र, शहरातील मध्यमवर्गीय व गरीब नागरीकांनी काय उपाय करावा असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, अशीच परिस्थितीत तालुक्यातील खेडया -पाडयात पाणी पुरवठा योजना नसल्याने तेथील रहिवासी खड्ड्यातील गढूळ व मातीमिश्रीत पाणी पित आहेत. नुकतेच ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्याने त्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरेंच्या प्रयत्नाने नवीन योजना मंजूर झाली असून ती साकारल्यावर यापासून विक्रमगडवासियांची सुटका होईल, अशी अशा येथील रहीवाशांना आहे़ त्यामुळे प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलणे आवश्यक आहे़ ही ग्रामपंचायत नगरपंचायत झाल्याने कारभारदेखील वाढलेला आहे़ लोकसंख्येमध्ये भर पडल्याने आता नवीन सुधारीत मोठया स्वरुपाच्या फिल्टर पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळावी व तिची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी होत आहे़.पाणी पुरवठाविभागाशी संपर्क साधला असता, विक्रमगडच्या नागरिकरणामध्ये झपाटयाने वाढ झाली असून सध्याच्या पाणी पुरवठयामध्ये प्रतिदीन साडेचार लाख लीटर पाण्याची आवश्यकता आहे़ मात्र, फिल्टर प्लँटची मर्यादा फक्त दिड लाख लीटरची असल्याने दिवसातून चारवेळा सोडण्यात येणारे पाणी पावसाळयात गढूळ व माती मिश्रीत होते़ त्यामुळे साडेचार लाख लिटर पाणी फिल्टर करण्याची क्षमता असलेला प्लँट हवा. तरच या समस्येवर उपाय करता येणार आहे़ आम्ही सध्या तुरटीचा वापर पाण्यामध्ये करीत आहोत़ असे नगरपंचायत पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ही समस्या प्रत्यक्षात दूर होणार तरी कधी हा जनतेचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. पाण्याची रोजची गरज साडे चार लाख लीटर आहेत तर फिल्टरची श्रमता दीड लाख लीटरची आहे. दरवर्षीचा हा प्रश्न असून आम्ही पाण्यामध्ये तुरटीचा वापर करुन ते निर्जंतूक करीत आहोत. - रविंद्र खुताडे, नगराध्यक्ष, विक्रमगड न.पं. मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायत नावालाच आहे. पाण्याचा प्रश्न दरवर्षीचा असल्याने आम्ही येत्या मंगळवार पासून उपोषणाला बसणार आहोत. - महेश पाटील, नरगसेवक, विक्रमगड न.पं.विक्रमगड नगरपंचायतीचा वाढता विस्तार पाहाता पालकमंत्र्यानीं सुधारीत पाच ते दहा लाख लीटर पाणी फिल्टर योजनेस मंजुरी देऊन हा प्रश्न कायमचा मिटवावा. तसेच तत्काळ मुख्याधिकारी नेमणूक करावी अशी लेखी मागणी वारंवार करीत आहोत़ त्याची अंमलबजावणी होणे देखील तेवढेच गरजेचे आहे़.-निलेश सांबरे, सामाजिक कार्यकर्ते
विक्रमगडला होतो आहे मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा
By admin | Published: July 16, 2017 2:13 AM