वसई - पालघर जिल्ह्यात पाऊस पडत असून बुधवार संध्याकाळपासून पालघर जंगलपट्टी भागात सोसाट्याचा वारा व अतिवृष्टीमुळे येथील वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्याच्या दोन्ही फिल्टर प्लांटचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे याचा विपरीत परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. त्यातच येथील धुकटंन व मासवण फिल्टर प्लांट मधील वीजखंडीत जोपर्यंत सुरळीत चालू होत नाही तोपर्यंत गुरुवारी देखील वसई विरार शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा नियंत्रक अधिकाऱ्याने लोकमतला दिली.
वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट (पालघर) परिसरात बुधवार पासून अतिवृष्टी तसेच जोराचा वारा सुरू आहे. १ डिसेंबर रोजी रात्री ७.४५ ते रात्री ८.४५ असा 1 तास म.रा.वि.म.(MSEB)विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रात्री ७.४५ च्या रात्री ते ९.४५ असा २ तास सूर्या धरणातून होणारा शहरातील पाणी पुरवठा पूर्ण पणे बंद होता. परिणामी गुरुवार २ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० पासून म.रा.वि.म. (MSEB) चा विद्युत पुरवठा खंडित झाला असून काही तांत्रिक बिघाड झाल्या मूळे हा विद्युत पुरवठा सकाळी ७.०० वाजे पर्यंत खंडीतच होता. एकुणच सदरचा तांत्रिक बिघाड दुरुस्ती नंतर म.रा.वि.म.(MSEB) चा विद्युत पुरवठा सुरळीत झाल्या नंतरच आता वसई विरार शहरातील सूर्या धरणातून होणारा पाणीपुरवठा सुरू होईल, असेही महापालिका प्रशासनाने कळवले आहे. त्यामुळे गुरुवारी शहरात होणारा पाणी पुरवठा अनियमित आणि कमी प्रमाणात होईल तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे विनंती वजा आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलं आहे.