संजय नेवेविक्रमगड : माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली आहे. यामुळे तालुक्यात बालमृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. विक्रमगड तालुक्यातील २,७५७ मातांची नोंदणी करण्यात आलेली असून संबंधित लाभार्थ्यांना बँक खात्यात १ कोटी ९४ लाख ५ हजार रुपये एवढे अनुदान जमा करण्यात आले आहे.
गर्भवती महिलांना सकस आहार देऊन सुदृढ बालक जन्माला यावे, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व स्तरातील पहिल्या वेळेस गरोदर राहिलेला महिलांना सकस आहार घेण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. यासाठी तीन टप्प्यात अनुदान वाटप केले जाते. ५ हजाराचे अनुदान मिळत असून एक हजार रुपये पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये अनुदान मिळत आहे. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पहिल्यांदाच गर्भवती राहणाऱ्या २,७५७ महिलांना १ कोटी ९४ लाख ५ हजार रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे. आरोग्यसेवक, सेविका, आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत मातृवंदना योजनेचा प्रचार प्रसार केला जातो. प्रथम गरोदर राहिलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी केली जाते.
आवश्यक कागदपत्रे
लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड, लाभार्थीचे आधार संलग्न बँक खाते, गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवसाच्या आत नोंद, शासकीय संस्थेत गरोदर काळात तपासणी, बाळाची जन्म नोंदणी व प्राथमिक लसीकरण.