वाडा : वाडा तालुक्यातील आबिटघर येथील रहिवासी असलेले प्रशांत पाटील यांनी आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत देशाचा आणि आपल्या कर्तृत्वाचा झेंडा सातासमुद्रापार फडकवला आहे. ‘शेती अवजारांच्या साहाय्याने वीज निर्मिती’ या प्रकल्पाच्या सादरीकरणातून त्याने अंतिम फेरीत तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालयासह त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अमेरिकेच्या वांशिग्टन शहरात झाला.
अमेरिका, जर्मनी, रशिया, कॅनडा, इराण, मेक्सिको, मंगोलिया यासारख्या प्रगत देशांतील स्पर्धक सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेच्या सात फेऱ्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना प्रशांतने उत्तम कामगिरी केली. शेती औजारांच्या साहाय्याने वीज निर्मिती या प्रकल्पाच्या सादरीकरणातून त्याने अंतिम फेरीत तृतीय क्रमांक पटकावला.
त्यानंतर नुकताच प्रतिष्ठित मानला जाणारा भारतीय सेनेकडून दिला जाणारा ‘राष्ट्रीय उन्नती पुरस्कार’ अमृतसर येथील आर्मीच्या अटारी कॅम्पमध्ये आर्मीचे मुख्य अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला. दि. २३ जानेवारीला राष्ट्रपती सचिवालय पुरस्कार राष्ट्रपती भवन दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. याचप्रमाणे महाराष्ट्र शासन खेळ व युवा मंत्रालय यांच्याकडून राज्यस्तरीय युवा उत्कृष्टता प्रदर्शन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यूथ आयडाॅल २०२०, राज्यस्तरीय संशोधन पुरस्कार, भारतीय छात्र संसद पुरस्कार, आविष्कार पुरस्कार अशा एकूण ३० पुरस्कारांचा प्रशांत मानकरी ठरला आहे. प्रशांत पाटील याच्याकडे आता ज्युनिअर शास्त्रज्ञ हे विज्ञान व तंत्रज्ञान विभाग दिल्ली यांच्याकडून प्रदान करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सलग दोन वर्षे महाराष्ट्र शासन अंगीकृत महाराष्ट्र विद्यार्थी परिषद या परिषदेचे अध्यक्ष हे पद भूषवीत आहे. प्रशांत संगमनेर येथील गुंजाळ इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी असून बी.एच.एम.एस.च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. या यशाबद्दल त्याचा शुक्रवारी भाजप पालघर जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.